कॅनडा सरकार एक ओपन वर्क परमिट स्ट्रीम तयार करणार आहे, ज्यामुळे १० हजार अमेरिकन एच-१ बी (H1B) व्हिसा धारकांना कॅनडामध्ये येऊन काम करता येईल. या अंतर्गत एच-१ बी व्हिसा धारकांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कॅनडामध्ये अभ्यास आणि काम करण्याची परवानगी मिळेल, अशी घोषणा कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री सीन फ्रेझर यांनी केली.
कॅनडा आणि यूएस या दोन्ही देशातील कंपन्यांमध्ये हाय-टेक क्षेत्रात हजारो कामगार काम करतात आणि यूएसमध्ये काम करणारे बहुतेक लोक एच-१ बी व्हिसा वापरतात.
१६ जुलै २०२३ पर्यंत, युनायटेड स्टेट्समधील एच-१ बी (H1B) विशेष व्यवसाय व्हिसाधारक आणि त्यांच्यासोबत राहणारे त्यांचे जवळचे कुटुंबीय कॅनडामध्ये स्थलांतरित होण्यासाठी अर्ज करू शकतात.
ज्या अर्जदारांना मंजुरी मिळेल त्यांना नवीन निर्णयानुसार तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ओपन वर्क परमिट देण्यात येणार आहे. ते कॅनडामधील जवळजवळ कोणत्याही कंपनीसाठी काम करण्यास सक्षम असतील. त्याच वेळी, त्याची पत्नी किंवा त्याच्यावर अवलंबून असलेले लोक तात्पुरत्या निवासी व्हिसासाठी पात्र असतील आणि गरजेनुसार, ते काम आणि अभ्यासाचे परमिट देखील घेऊ शकतील, असेही सीन फ्रेझर यांनी म्हटले आहे.