नवी दिल्ली : येत्या आर्थिक वर्षापासून शुल्कमुक्त आयातीचा निर्णय रद्द करण्यात येणार असल्यामुळे १ एप्रिलपासून कच्च्या सोयाबीन तेलावर आयात शुल्क लागणार आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र देशातील सोयाबिनला सोन्याचे दिवस येतील. एकीकडे फोडणी महाग होण्याची चिन्हे स्पष्ट होत असतानाच गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. परिणामी चपाती (पोळी) वर संक्रांतीचे सावट येऊ घातले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे दर तेजीत असल्याने देशांतर्गत बाजारपेठेतील दर देखील मागील वर्षी वाढले होते. मोदी सरकारने महागाईचे कारण पुढे करत २४ मे २०२२ रोजी सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्क काढण्याचा निर्णय घेतला.
दोन वर्ष प्रत्येकी २० लाख टन कच्चे सोयाबीन तेल तसेच कच्चे सूर्यफूल तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली. दोन वर्षात चाळीस लाख टन तेलाची आयात होणार होती पण आता आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे भाव गडगडले आहेत.
पाम तेल ३० टक्क्यांनी तर सोयाबीन तेल १० टक्के आणि सूर्यफूल तेल ७ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे १ एप्रिल २०२३ पासून कच्च्या सोयाबीन तेलाच्या शुल्कमुक्त आयातीचा निर्णय रद्द केला जाणार आहे. तथापि, सूर्यफूल तेलाची शुल्कमुक्त आयात पुढील वर्षी देखील सुरू राहणार आहे.
याचप्रमाणे युक्रेन- रशियात भडकलेले युद्ध आणि पाकिस्तान, श्रीलंकेतील संकटामुळे केंद्र सराकारने मे २०२२ ला गव्हाच्या निर्यातीवर घातलेली बंदी आता उठविण्याची तयारी सुरू केली आहे. गव्हाची शेती करणा-यांपेक्षा व्यावसायिकांनाच या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे. देशात यंदा गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादनात होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
मार्च-एप्रिलमध्ये उठेल बंदी
गव्हाच्या वाढत्या किमती पाहता केंद्र सरकारने मे २०२२ मध्ये निर्यातीवर बंदी घातली होती. आता गव्हाचा नवा हंगाम सुरु आहे. त्यामुळे केंद्राने निर्यात बंदी हटवण्याची तयारी सुरु केली आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी मार्च-एप्रिलच्या आसपास यावर निर्णय होणार असल्याचे संकेत दिले.
गेल्यावर्षीच्या उष्ण हवामानाचा गव्हाच्या उत्पादनावर परिणाम झाला. उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाचे उत्पादन घटले होते. तरीही केंद्र सरकारने निर्यात सुरूच ठेवली होती. गेल्या काही महिन्यांपासून गव्हाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पीठही महाग झाले आहे.