भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने राज्यातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम आखला आहे. अमृत वाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी व तिच्या उपनद्या (मराठवाडा), कृष्णा, भीमा व तिच्या उपनद्या (पश्चिम महाराष्ट्र), नाग व अन्य नद्या (विदर्भ), पंचगंगा (दक्षिण महाराष्ट्र) अशा अनेक नद्यांचा समावेश आहे. या प्रत्येक नदीची काही ना काही समस्या आहेच. तथापि, पुणे जिल्ह्यात भीमाशंकर इथे उगम पावणारी भीमा नदी असो कि त्र्यम्बकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी असो अशा साऱ्या नद्या जलप्रदुषणामुळे मरणोन्मुख स्थितीत आहेत. सरकारी आस्थापनांची उदासीनता, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि स्थानिक रहिवाशांची बेपर्वाई यामुळे सतत प्रदूषण वाढत आहे. जलप्रदुषणामुळे लाखो भाविक आणि नदी खोऱ्यातील रहिवाशांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
क्षमामि चंद्रभागा
उजनी धरणातील मैलामिश्रित घाण पाण्याचे मूळ पुणे जिल्ह्यातून वाहत येणाऱया भीमा नदीत आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील जनतेचे मलमूत्र, प्रक्रिया विरहित रासायनिक सांडपाणी, कारखान्यांमधील काळे पाणी यामुळे उजनी धरण प्रचंड मोठ्या डबक्यात रुपांतरित होत आहे. त्यामुळे नमामि चंद्रभागा म्हणण्याऐवजी क्षमामि चंद्रभागा म्हणण्याची वेळ आली आहे. भीमा नदी शुद्धीकरणाची मोहीम पुणेकरांनी राबवणे आवश्यक आहे. पोटाचे तसेच त्वचारोगांसह अन्य साथीच्या आजारांना नदीकाठच्या तसेच या नदीचे पाणी वापरणाऱ्या समस्त रहिवाशाना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात वेळीच उपाय योजना केली नाही तर भावी पिढ्याच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
कृष्णा नदीची मुख्य उपनदी म्हणून भीमा ओळखली जाते. भीमेचे खोरे सुमारे सहा दशलक्ष हेक्टरचे आहे. पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे वाहणारी म्हणजेच ही पूर्ववाहिनी नदी पुणे, सोलापूर जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जाते. पुणे जिल्ह्यातील तिच्या उपनद्या आणि पुणे व पिंपरीचिंचवड महानगरपालिकेच्या मैलामिश्रित घाणपाण्यामुळे भीमा नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे.
या जलप्रदूषणात इंद्रायणी, मुळा, मुठा, कुकडी, घोड, भामा, पवना या महत्त्वाच्या उपनद्यांचा वाटाही मोठा आहे. कुकडीची लांबी 95 किमी, घोड 67 किमी, इंद्रायणी 85 किमी, भामा 56 किमी, मुळा 50 किमी, पवना 48 किमी, मुठा 70 किमी, मुळा-मुठा 66 किमी लांबीची आहे. या नद्यांचा भीमेत संगम होतो आणि पुढे हा प्रवाह भीमा या नावाने ओळखला जातो.
जलप्रदूषणाची कारणे
पुणे व पिंपरी चिंचवडमधील नागरी वस्त्यांमधून येणारे मैलामिश्रित घाण पाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. या दोन्ही शहरांना महानगरपालिकेतर्फे जेवढा पुरवठा केला जातो, त्यापैकी ८० टक्के पाण्याचे सांडपाण्यात रुपांतर होते. पुणे जिल्ह्यातील नऊ औद्योगिक वसाहती, नदीकाठचे उद्योग धंदे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी सोडतात. त्यातील अनेक उद्योगांनी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे बसवल्याचा दावा केला आहे. तरीही भीमेचे पाणी प्रदूषित होत आहे. घनकचऱयाचे लिचेट, शेतातून वाहून येणारे पावसाचे पाणी येताना किटकनाशक फवारणीचा द्रव घेऊन येते हेही एक महत्त्वाचे कारण आहे.
सरकारी यंत्रणा जबाबदार
सतत घाण मिसळून उजनी धरणाचे मोठ्या डबक्यात रुपांतर होत आहे. त्याला पुणे जिल्ह्यातील विविध आस्थापना जबाबदार आहेत. उजनी धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या भीमा नदीस अप्पर भीमा क्षेत्र म्हणतात. अप्पर भीमा क्षेत्रात मिसळले जाणारे घाण पाणी उजनी जलाशय प्रदूषित करत आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा, तळेगाव, आळंदी, जुन्नर, शिरूर, सासवड, जेजुरी, दौंड, बारामती आणि इंदापूर या दहा नगरपालिका, देहू-खडकी-पुणे या छावणी क्षेत्राच्या नागरी व सैनिकी वसाहती, नदीकाठची 196 गावे – त्यात दौंड तालुक्यातील 33, हवेलीतील 35, इंदापूरातील 19, शिरूर 11. मावळ 63 आणि खेड तालुक्यातील 35 गावांचा समावेश आहे. नदीकाठची नऊ औद्योगिक क्षेत्रे – त्यात तळेगाव, चाकण, तळवडे, भोसरी (पिंपरीचिंचवड), हिंजवडी, रांजणगाव, जेजुरी, बारामती, कुरकुंभ यांचा समावेश आहे. याखेरीज सात मोठे उद्योग अप्पर भीमेत रासायनिक सांडपाणी सोडत आहेत.
– रजनीश जोशी, सोलापूर (मोबाईल – ९८५००६४०६६)