औरंगाबाद : महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा देवगिरी नागरी सहकारी बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत कर्जवाटप केलेल्या कर्जदारांसाठी व्यवसायवाढ मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली. सदर कार्यशाळेत व्यावसायिकांना व्यवसाय वाढ आणि विस्तारासाठी ‘Grow Up’ चा मूल मंत्र देण्यात आला. देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, उपाध्यक्ष संजय गायकवाड, संचालक जयंत अभ्यंकर, संदीप पंडित, संचालिका श्रीमती जयश्री किवळेकर ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत उपस्थित नवउद्योजक, व्यापारी यांना सुप्रसिद्ध सीए प्रवीण बांगड यांनी व्यवसायाचा हिशोब कसा ठेवायचा याबाबत मार्गदर्शन केले, तर औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुमित पारिक यांनी छोट्या व्यवसायाचे मोठ्या व्यवसायात कसे रूपांतर करायचे, व्यवसाय करताना कठीण परिश्रमाबरोबर नवीन तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन व्यवसाय कसा यशस्वी करता येतो याबाबत स्वानुभव कथन केला, तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक सौ पूजा तांबेकर यांनी सदर योजने संदर्भातील उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
समारोपीय मार्गदर्शन करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत सहकार्यवाह व कृषी तज्ञ धनंजय धामणे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर काय करावे व काय करू नये याबाबतचा मंत्र दिला. देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, देवगिरी बँक ही कायम नवीन उद्योग व्यवसाय उभा करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आतापर्यंत बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत ४५० कर्ज प्रकरणांचे वाटप करून नवीन व्यवसाय उभारणी करिता अर्थसहाय्य केले आहे.
कार्यशाळेत ६० व्यावसायिकांची उपस्थिती होती. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेत बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपेंद्र कोयाळकर, बँकेच्या कर्ज विभाग प्रमुख सौ.मनाली कुलकर्णी, उमेश राऊत, भरत म्हस्के, अनिरुद्ध जाधव यांची उपस्थिती होती. सदर कार्यशाळेत देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, उपाध्यक्ष संजय गायकवाड, संचालक जयंत अभ्यंकर, संदीप पंडित, संचालिका जयश्री किवळेकर ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.