बीड : विशेष प्रतिनिधी
आरोग्य यंत्रणेतील औषध पुरवठा करणारी यंत्रणा रुग्णांच्या जिवावर उठल्याचे बनावट औषधी पुरवठ्यावरून स्पष्ट झाले आहे. तपासणीसाठी पाठविलेल्या गोळ्यांबाबतचा अहवाल सव्वा वर्षानंतर प्राप्त झाला आणि चौघांवर गुन्हे नोंद झाले. मात्र, तोपर्यंत या बनावट गोळ्या साडेआठ हजारांपेक्षा अधिक रुग्णांच्या पोटात गेल्या आहेत. जर यात काही घातक घटक असते तर रुग्णांचा जीव गेला तरी अहवालच आला नसता आणि कारवाईही झाली नसती. त्यामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे, हेच यावरून स्पष्ट होत आहे.
Save Swiftlet | वेंगुर्ल्याजवळील ‘पाकोळ्या’चा सर्वांत मोठा अधिवास नष्ट होण्याची चिन्हे!
विशाल एंटरप्राइजेस या पुरवठादार कंपनीने अॅजीथ्रोमायसिन-५०० या २५ हजार ९०० गोळ्यांचा पुरवठा केला होता. परंतु, तोपर्यंत अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या औषधी विभागातील या गोळ्यांचा साठा संपूनही गेला होता. या औषधींमध्ये अॅजिथ्रोमायसिन नावाचे घटकच नसल्याचे उघड झाले होते. परंतु यामध्ये जर एखादा घातक घटक असता तर त्याचे गंभीर परिणाम झाले असते. दरम्यान,सुदैवाने यापैकी कोणत्याही रुग्णाची तक्रार आमच्याकडे आली नसल्याचे बीडच्या स्वाराती रुग्णालयाचे डॉक्टर शंकर धपाटे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानेच बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. याप्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल झाला. या बनावट औषध निर्मिती आणि विक्री प्रकरणात आंतरराज्य टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात असून बीड पाठोपाठ वर्धा आणि भिवंडीमध्ये सुद्धा कंत्राटदाराने बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे उघडकीस आले आहे.
