वॉशिंग्टन I अमेरिकेने नुकत्याच पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये सुपर ८ मध्ये धडक दिली होती. आयसीसीने आता अमेरिका क्रिकेट बोर्डाला एक नोटीस दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
टी-२० वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणा-या अमेरिका संघावर बंदीचे सावट आहे. आयसीसीने अमेरिका क्रिकेट बोर्डाला नोटीस जारी केली आहे. कोलंबोमध्ये झालेल्या बैठकीनंतर ही नोटीस जारी करण्यात आली.
आयसीसीच्या बैठकीत मध्ये टी-२० वर्ल्ड कपचं आयोजन आणि इतर मुद्यांवर चर्चा झाली. यानंतर आयसीसीनं प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये अमेरिका आणि चिली क्रिकेट बोर्डाला निलंबनाची नोटीस जारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दोन्ही बोर्डांना या नोटीसनंतर एका वर्षात आयसीसीनं दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागणार आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार अमेरिकी क्रिकेट बोर्डानं दोन प्रकरणांमध्ये प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं आहे. अमेरिका क्रिकेट बोर्डाला पूर्णवेळ सीईओ नाही. याशिवाय यूएसए क्रिकेट बोर्डाने ऑलिम्पिक आणि पॅरालम्पिक असोसिएशनकडून मान्यता घेतलेली नाही.
पुढील एका वर्षात अमेरिका क्रिकेट बोर्डाला या गोष्टी कराव्या लागणार आहेत. या गोष्टी न केल्यास अमेरिका क्रिकेट बोर्डावर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते. अमेरिका क्रिकेट बोर्डानं आयसीसीने जारी केलेल्या नोटीसप्रमाणं कार्यवाही न केल्यास २०२६ मध्ये होणा-या टी-२० वर्ल्डकपमध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही.