बारामती : प्रतिनिधी
लोकसभेनंतर शरद पवार यांनी विधानसभेच्या ‘पेरणी’साठी मशागत सुरू केली आहे. दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार तीन दिवस बारामतीत आहेत. त्यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत. ३ दिवसात ११ शेतकरी मेळावे घेणार आहेत.
शरद पवार पुन्हा शेतक-याच्या बांधावर जात आहेत. यापूर्वी शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी गावांचा दौरा केला होता. त्यानंतर उद्यापासून पुन्हा दौ-यावर जाणार आहेत.
शरद पवारांनी नुकतेच दुष्काळी दौरा केला. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. तेव्हा शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे विनंती करणार आहे. मात्र सध्याचे सरकार माझे किती ऐकेल हे माहिती नाही.
शेतक-यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्य हातात पाहिजे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला जसे आपण साथ दिली तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही साथ द्यावी, अशी साद पवारांनी शेतक-यांना घातली. त्यानंतर आता शरद पवार शेतकरी मेळावे घेणार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का देणारा निकाल समोर आला. तर इंडिया आघाडीला मात्र आशा दाखवणारी स्थिती आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ जागांवर विजय मिळवता आला.
सांगलीची जागा अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी जिंकली. त्यांनीही नंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे असल्याचे चित्र आहे.