२०१९च्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला. या लढतीमध्ये संदीप यांना ९९ हजार ९३४ तर जयदत्त क्षीरसागर यांना ९७ हजार ९५० मते मिळाली. साधारण दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले. जयदत्त क्षीरसागर यांचे घर फुटले असले तरी त्यांचे दुसरे लहान बंधू आणि जे मागील ३० वर्षांपासून बीड नगर पालिकेत नगराध्यक्ष आहेत; ते भारतभूषण क्षीरसागर त्यांच्यासोबत होते. तुलनेने संदीप क्षीरसागरांनी एकाकी झुंज दिली. आता पुन्हा एकदा राजकीय परिस्थिती बदलत आहे.
२०१९मध्ये शिवसेनेत गेलेले क्षीरसागर तिथे फार रमले नाहीत. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी बजरंग सोनवणे यांना मदत केल्याची चर्चा झाली होती. शिवाय निवडून आल्यानंतर सोनवणे यांनी क्षीरसागरांची भेटही घेतली.
आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांच्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली, त्यामुळे बीडमध्ये आता पुन्हा राजकीय समीकरण बदलत आहे. विरोधात असलेला पुतण्या काकांसोबत येणार का? अशी चर्चा होत आहे.