नवी दिल्ली : प्रतिनिधी
टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये १ ते २९ जून दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी काही संघ आधीच अमेरिका आणि वेस्ट इंडिजला पोहचले आहेत, तर काही संघांची तिथे जाण्याची तयारी सुरू आहे. भारतीय संघाचीही वर्ल्ड कपसाठी तयारी झाली आहे.
भारताचा या टी-२० वर्ल्ड कपमधील पहिला सामना ५ जून रोजी होणार आहे, पण त्याआधी १ जून रोजी भारताचा बांगलादेशविरुद्ध सराव सामना होणार आहे. त्याआधी भारतीय संघ दोन तुकडीमध्ये न्युयॉर्कला जाणार आहेत.
भारतात सध्या जरी आयपीएल सुरु आहे. त्याचमुळे भारतीय संघातील खेळाडू दोन तुकडीमध्ये न्युयॉर्कसाठी रवाना होणार आहेत.
पहिली बॅच शनिवारी (२५ मे) रात्री मुंबईतून दुबईमार्गे न्युयॉर्कला जाईल. पहिल्या तुकडीमध्ये कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव असे काही प्रमुख खेळाडू असणार आहेत. या खेळाडूंच्या संघांचे आयपीएलमधील आव्हान आधीच संपलेले आहे.
तसेच दुस-या तुकडीमध्ये संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, आवेश खान, यशस्वी जैस्वाल हे खेळाडू असतील. यांच्यासह रिंकु सिंगही असेल. ही बॅच आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यानंतर न्युयॉर्कला जाण्याची शक्यता आहे.
यातील रिंकु वगळता बाकी खेळाडू राजस्थान रॉयल्स संघाचे भाग होते. राजस्थानचे आयपीएलमधील आव्हान नुकतेच शुक्रवारी (२४ मे) संपले आहे. त्यामुळे हे खेळाडू दुस-या बॅचमध्ये आहेत.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रविवारी (२६ मे) रोजी होणा-या आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांत टी-२० वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या १५ जणांच्या भारतीय संघातील खेळाडू नाहीत. भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या लंडनमध्ये आहे. त्यामुळे तो तिथूनच टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात सामिल होईल.
टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.