khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Beed Election 2024 : राजकीय साठमारीत बीड जिल्ह्याची होरपळ

ग्राउंड रिपोर्ट

 

 

‘मंत्री धनंजय मुंडे हे प्रामाणिक आहेत. जातीयवाद करीत नाहीत, असे वाटले होते. मागील दोन-चार दिवसांत तेही पुढे आले आहे. मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात,’

…………..

‘मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ. तुला जीवे मारू असे म्हटले जात आहे. तसेच मला बीडमध्ये पाय ठेऊ दिले जाणार नाही असेही म्हटले जात आहे. परंतु, मुंडे- बहिण भावाने एक लक्षात घ्यावे, मला बीडमध्ये येऊ दिले नाही, तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचे आहे’.

अर्थातच ही दोन्ही विधाने मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रवर्तक मनोज जरांगे-पाटील यांनी या आठवडाभरातच केलेली आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यात कधी जातीयवादाने तोंड काढले नाही, मात्र आता जातीयवाद फोफावला आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. मुळात हे विषवल्लीचे बीज कोणी पेरले, त्याला कोणी कशा पद्धतीने खत-पाणी घातले याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. आणि बीड जिल्ह्यातूनच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून जातीयवादाचे समूळ निर्मूलन कसे करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका घेतली पाहिजे असे आम्हाला आणि समस्त समाजाला आणि बीड जिल्ह्यातील जनतेला देखील वाटते.

आज ते केवळ समाजाच्या एका घटकासाठी लढा देत आहेत, मात्र याच समाजातील अन्य वंचित घटकांवर अन्याय होणार नाही, याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. त्यांना स्वत:च्या म्हणून काही महत्वाकांक्षा असू शकतात आणि असायला पण हव्यात या विषयी आमचे दुमत नाही. परंतु, ज्या छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जो लढा उभारला आहे, ती मूळ तत्वे बाजूला सारली जाऊ नयेत, अशी तमाम जनतेची अपेक्षा आहे.

धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सामिल होण्यासाठी राजकीय प्रतिनिधीत्वाची गरज हेरून त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही भूमिका घेतली, आणि त्यांनी प्रसंगोपात ती जाहीरपणे मांडली. त्याचे परिणाम देखील दिसून येत आहेत. त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट…

प्रामुख्याने असे म्हटले जात आहे की, यंदा बीड जिल्ह्याची लोकसभा निवडणूक जातीयवादाच्या मुद्यावरच लढल्या गेली. यामागील ठळक आणि प्रमुख कारण म्हणजे मराठा समाजाची आक्रमक भूमिका. शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याने स्वत:च्या अपेक्षेप्रमाणे राजकीय डाव खेळून घेतले, आणि अनेक बाबी साध्य करून घेतल्या. महत्वाचे म्हणजे अजितदादांची भाजपच्या डे-यात पाठवणी करून ‘‘जमतंय का’’ याचा अदमास घेतला. (म्हणजे पहाटेचा शपथविधी वगैरे) त्यानंतर अडीच वर्षे आघाडी सरकार चालवले. त्यासाठी त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडून स्वत:ला म्हणून पाठींबा मागितला.

उद्धव ठाकरे यांना ऐनवेळी मुख्यमंत्री करण्यासारखी चाल महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर खेळली आणि सरकारी कारभाराचा कासरा स्वत:च्या हातात ठेवण्यात शरद पवार कमालीचे यशस्वी झाले. या कालावधीत उद्धव ठाकरे यांची निष्क्रियता जशी उघड झाली त्याचसोबत घरी बसून कारभार हाकण्याची कार्यशैली आणि शारीरिक मर्यादेमुळे आलेली हतबलता महाराष्ट्राला पहायला मिळाली. परिणामी, राज्य सरकार बद्दल मराठा समाज वगळता इतर समाजात निर्माण झालेली नाराजी विस्तारत गेली.

यात गंमत अशी की,  पुन्हा एकदा ‘शरद पवार साहेबांना चॅलेंज नाही’ या मूडमध्ये राज्यातील सकल मराठा समाज होता. पण शिवसेना जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यामुळे फुटली (की फोडली?) तोपर्यन्त सर्व राजकीय डावपेचांना मराठा समाजाची मूकसंमती होती. इथं पर्यन्त सर्व ठीक होते, जेव्हा राष्ट्रवादीच अजितदादांमुळे फुटली (की फोडली?) तेंव्हा मात्र मराठा समाजाच्या अस्मितेवरच जणू घाव घातला गेला अशी भावना निर्माण झाली, (की केली?) शरद पवार यांचाही पक्ष फुटू शकतो आणि पवार साहेबांनाही कोणीतरी चितपट करू शकतो ही सल वणव्यासारखी सारखी पसरत गेली; आणि हे सगळे घडवून आणणारा व्यक्ती कोण, आहे हे न कळण्याएवढा मराठा समाज दुधखुळा नक्कीच नाही. हे फडणवीस यांनी घडवून आणले आहे आणि फडणवीस भाजपचे आहेत, त्यात पुन्हा ते ब्राम्हण आहेत, या बाबी मराठा समाजाच्या मनात उद्रेक करण्यास कारणीभूत ठरल्या आणि त्यातून काय झालं तर राजकीय सूड उगवू या भावनेतून सर्व समाज पवारांच्या मागे एकवटला त्यांना देशात मोदी असो किंवा नसो, पण राज्यात भाजप नको ही भावना निर्माण झाली. आणि चक्क मराठा समाजाने मुस्लिम समाजाशी जवळीक साधली. काँग्रेस बद्दल सामान्य मराठा समाजाला फार आस्था आहे असे बिलकुल नाही. पण भाजप नको या भावनेतून जसे मुस्लिम जवळ केले; तसेच काँग्रेसला सोबत घेतले.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविषयी मराठा समाजाला आणि शरद पवारांना फार कळकळ आहे असेही बिलकुल वाटत नाही. (तो व्हिडीओ बघा शरद पवार उद्धव ठाकरेंना चेंबरमधून जाण्यास सांगतात. त्यांना बाहेर थांबा वगैरे म्हणतात) पण जी शिवसेना फोडण्यात शरद पवारांना यश आलेले नव्हते ते भाजपच्या फडणवीस यांनी करून दाखवलं होतं आणि पवारांचा पक्षही फोडला होता.

बीड जिल्ह्यात मुंडे विरोधी राजकारण करायचे म्हणून मराठा राजकारणी शरद पवार यांनी एकत्र आणले. (त्यासाठी त्यांना मुंडे आणि क्षीरसागर यांचेही घर फोडावे लागले) बीड लोकसभेची जागा शरद पवार गटाला सुटली मात्र, दुस-या फळीतील व्यक्ती शिवाय पवारांना ही पर्याय नव्हता (सुशिलाताई मोराळे यांचा विचार झाला असता तर कदाचित चित्र वेगळे असते) आणि ‘मला तिकीट द्या, मी लढतो’ म्हणणारे बजरंग सोनवणे आयते गळ्यात पडले. त्यांनी सुरवातीला ज्योती मेटे हा पर्याय तपासून पहिला पण त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आणि कार्यकर्त्यांची वाणवा निघाली. तुलनेने यामध्ये बजरंग सोनवणे उजवे ठरले. आता जिल्ह्यात मराठा समाजाच्या अस्मितेला फक्त फुंकर घालायचे बाकी होते ते काम मराठा आरक्षण आंदोलनाने फत्ते केले.

मनोज जरांगे-पाटील यांनी, ‘तुम्हाला जे करायचे ते करा मी सांगणार नाही’ असे कितीही म्हटले असले तरी उघड-उघड मराठा समाजाचा ‘इगो’ कुरवाळला जाईल अशीच भूमिका त्यांनी घेतली होती.

एकंदरीत शरद पवारांनी बीड जिल्ह्यात मराठा समाजाचे ध्रुवीकरण केले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यामुळेच भाजप नको हा द्वेष मोठा झाला आणि मुस्लिमांना सोबत घेत बीडची जागा लढवली गेली. मग परत एकदा ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद उफाळुन आला. त्याचे मूळ ‘आमची राष्ट्रवादी फोडली’ यामध्ये दडलेले होते.

एकुणात या सर्व पार्श्वभूमीवर बीडची लोकसभा लढल्या गेली आता प्रश्न असा पडतो की, जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे बीडची जागा नसती; ती काँग्रेसकडे किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली असती आणि काँग्रेस किंवा ठाकरे यांनी बिगर मराठा समाजाचा उमेदवार दिला असता तर मराठा समाज असा एकवटला असता का?

याचे उत्तर निश्चितच नाही असेच असू शकेल, ओबीसी विरुद्ध मराठा या लढाईत यापूर्वीही ओबीसी उमेदवार जिंकलेला आहे. ज्या-ज्या वेळी मराठा समाज एकवटतोय किंवा त्यांचे ध्रुवीकरण केले गेले. त्या-त्या वेळी ओबीसी आणि मराठेत्तर समाज एकवटला गेला असाच इतिहास आहे.

आता राहिले मुस्लिम. तर मुस्लिमांना भाजपने स्वत:कडे येण्याचा मार्ग जवळपास बंदच केला होता. (मोदी यांनी अंबाजोगाई येथील भाषणात उपस्थित केलेला कर्नाटक आरक्षण मुद्दा ज्याची काहीही गरज नव्हती) मग मुस्लिमांना भाजप सोडून इतर उमेदवाराला मतदान करावे लागले. ते बीडमध्येच नव्हे, तर इतर ठिकाणीही महाविकास आघाडीला आयते मिळाले. मात्र प्रत्यक्षात खरोखरच असेच झाले आहे का? तूर्त तरी हे कळायला मार्ग नाही. त्यासाठी आपल्याला ४ जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

आजवरच्या या बीड लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील सारा घटनाक्रम पाहता बदला किंवा सूड या भावनेतून संघटित झालेला समाज किंवा संघटना विधायक काही करेल असे कधी दिसले नाही याचा रिझल्ट नेहमीच नकारात्मक आला आणि हाच नैसर्गिक न्याय असावा.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »