khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Nanded election : कावेबाजांच्या चक्रव्युहात चिखलीकरांचा विजयरथ!

अशोक चव्हाण ठरणार संकटमोचक?

नांदेड जिल्ह्याच्‍या राजकारणाचा गेल्या २० वर्षाचा विचार करता अशोक चव्‍हाण यांच्‍यानंतर ठळकपणे जे नाव अधोरेखित केले जावू शकते ते म्‍हणजे प्रताप पाटील चिखलीकर. नांदेड लोकसभा मतदार संघातील भाजपाचे ते आता उमेदवार आहेत. २०१९ च्‍या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्‍हाण यांच्‍यासारख्या मातब्‍बर उमेदवाराविरुद्ध भाजपाने चिखलीकर यांना अनपेक्षितपणे उभे केले आणि त्‍यावेळी झालेल्या चुरशीच्‍या लढतीत त्‍यांनी आपले ‘प्रताप’ हे नाव खऱ्या अर्थाने सार्थ ठरविले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. अर्थातच ही लढत जिंकणे हा एक ‘प्रताप’च होता.

आता अशोक चव्हाण यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे यंदा चिखलीकर यांच्यासाठी ही लोकसभा निवडणूक सोपी जाईल, असे तूर्त गृहीत धरले जात आहे. मात्र शनिवारी (दि. १६) चिखलीकर यांचे नांदेडमध्ये आगमन होताच जे जंगी स्वागत झाले, त्यावेळी अशोक चव्हाण गटातील मान्यवर नेते, कार्यकर्त्यांनी तसेच काही भाजपाईंनी देखील पाठ फिरवल्याचे दिसून आले. ही बाब चव्हाण गटाच्या मनातील आणि भाजपच्या गोटातील ‘भाव’ दाखवून देण्यास पुरेशी ठरावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

स्व. शंकरराव आणि चव्‍हाण परिवाराच्या माध्यमातून राजकारणात पाय रोवलेले प्रताप पाटील चिखलीकर काँग्रेसमध्ये असताना स्‍थानिक राजकारणात चव्‍हाण समर्थक म्‍हणूनच ओळखले गेले; पण आमदार होण्यासाठी त्‍यांना २००४ साली स्‍वतःचा स्‍वतंत्र मार्ग शोधावा लागला. तेथून पुढे अशोक चव्‍हाण व चिखलीकर यांच्‍यात आधी दुरावा आणि नंतर राजकीय शत्रुत्‍व निर्माण झाले. अर्थात त्‍या पुढच्‍या राजकारणात हे शत्रुत्‍वच या दोघांना लाभदायक ठरत गेले, हे देखील तितकेच खरे.

काँग्रेससह अन्य पक्षांमध्ये वावरताना चिखलीकर यांनी महाराष्ट्रातील काही दिग्‍गज नेत्‍यांची कार्यशैली जवळून अनुभवली, त्‍यातून त्‍यांनी स्वतःची स्‍वतंत्र कार्यशैली निर्माण केली खरी, मात्र काही त्रुटींमुळे स्वपक्षीय दुखावले आणि दुरावत गेले. त्यांना पुन्हा सोबत कसे घेता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे वाटते. सरपंच ते खासदार या राजकीय प्रवासात त्‍यांनी लोकसंग्रह विस्तारत नेला. आमदार आणि खासदार असतानाच्या कार्यकाळात राजकीय कार्याला विधायक, सामाजिक आणि सांस्‍कृतिक उपक्रमांची जोड देत राजकारणाच्‍या मुख्य प्रवाहात राहण्याची कायम दक्षता ते घेत आले आहेत, ही जमेची बाजू म्हणता येईल.

चिखलीकरांचे वास्‍तव्‍य नांदेड शहरात, त्यांचा मित्र परिवार खूप दांडगा; पण त्‍यांचा लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात येत नसतानाही २०१९ साली ते नांदेडमधून उभे राहिले. प्रतिस्‍पर्धी अशोक चव्‍हाण यांनी पहिल्या टप्‍प्‍यातच चिखलीकरांना ‘चिल्लर’ असे संबोधले होते; पण नंतर चव्‍हाणांच्‍या धनशक्‍तीपुढे ही चिल्लरच भारी ठरली. चव्‍हाणांना पराभूत केल्यानंतर भाजपात नरेंद्र मोदींसह अनेक नेत्‍यांना त्‍यांचे कौतुक वाटले, मात्र इंग्रजी व हिंदी या भाषेवरील प्रभुत्‍वाअभावी इतर खासदारांप्रमाणे चिखलीकर लोकसभेमध्ये प्रभाव पाडू शकले नाहीत. हा त्यांच्यातील ड्रॉ – बॅक मान्य करावाच लागेल.

खासदारकीच्‍या पाच वर्षांतील त्‍यांचे प्रगतिपुस्‍तक एखाद्या हुशार विद्यार्थ्याला साजेल असे नसले तरी पण राज्‍य आणि केंद्रीय पातळीवरील नेते, वेगवेगळ्या खात्‍यांचे मंत्री यांच्‍याशी संवाद वाढवून त्‍यांनी रेल्वेचे काही प्रकल्प आणि वेगवेगळ्या मागण्या मार्गी लावल्या. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्‍या माध्यमातून विविध कामांसाठी जिल्ह्यात निधी आणला. लोकांच्‍या सार्वजनिक-व्‍यक्‍तिगत प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या बाबतीत ते नेहमीच तत्‍परता दाखवत असतात, ही बाब उल्लेखनीय ठरते.

Advertise with us

अशोक चव्‍हाण यांच्‍यानंतर जिल्ह्यात आपणच क्रमांक दोनचे नेते आहोत, हे प्रताप चिखलीकरांनी मागील काही वर्षांत नक्कीच सिद्ध केले. पण त्‍यांच्‍या कार्यशैलीमुळे भाजपातला एक मोठा गट विरोधात गेला आणि त्‍यांच्‍या उमेदवारीलाच आव्‍हान मिळाले. तथापि, पहिल्याच यादीमध्ये नाव आणत चिखलीकर यांनी आपले सामर्थ्य दाखवून दिले असले तरी दुखावलेल्या आणि मनाने दुरावलेल्या स्वपक्षीय मंडळींना पुन्हा जवळ करण्यासाठी ते कशा पद्धतीने पुढाकार घेतात यावरच मुख्यत्वे त्यांची विजयपथावरील वाटचाल अवलंबून राहणार आहे.

२०१९ साली चिखलीकरांच्‍या ‘प्रतापा’चा तडाखा अशोक चव्‍हाण यांना बसला. आता लोकसभेसाठी चिखलीकरांविरुद्ध काँग्रेसकडून वसंतराव चव्‍हाण दंड थोपटून तयारीत आहेत. मात्र त्यांच्यासमोर प्रकृती अस्वास्थ्याचे आव्हान आहेच. त्यामुळे हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी नांदेडचे मैदान मारण्यासाठी तयारी चालविली आहे. काँग्रेसकडे उमेदवार नसेल तर नांदेडची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. जर काँग्रेसने फारसे आढेवेढे न घेता जागेची अदलाबदल स्वीकारून सुभाष वानखेडे यांना बळ देण्याची भूमिका घेतली तर कदाचित, नांदेड लोकसभेच्या आखाड्यातील लढतीचे चित्र बरेचसे बदलू शकते. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस जनांची चतुराई आणि मराठा आरक्षण समर्थकांचा गनिमी कावा चिखलीकर यांना भारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना प्रताप चिखलीकर यांच्या समोरील अडचणीत आणखी भर पडू शकते. त्यावेळी अशोक चव्हाण यांना अपरिहार्यपणे चिखलीकर यांच्यासाठी संकटमोचकाची भूमिका बजावावी लागेल, हे नक्की. अर्थातच ही भूमिका ते कशी पार पाडतात हे येत्या काही दिवसांत साऱ्यांना पाहायला मिळेलच.

एक मात्र खरे की, नांदेड लोकसभा मतदार संघातील ही निवडणूक प्रतापराव चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांच्यातील राजकीय कस अजमावून पाहणार हे निश्चित. अशोक चव्हाण भाजपवाशी झाल्यामुळे आपला विजय सोपा झाला, या भ्रमात कोणी राहू नये. भलेही जिल्ह्यात काँग्रेस काहीशी दुबळी झाली असेल तरीही भाजपला जिंकण्यासाठी सर्वतोपरी शर्थ करावी लागणार आणि हे कोणीही नाकारू शकत नाही.

तूर्तास वसंत चव्‍हाण हे नांदेड जिल्ह्यातील नायगावचे भूमिपुत्र तर प्रताप चिखलीकर हे नायगाव तालुक्‍याचे जावई आहेत. यंदाची लोकसभेची लढत नायगावचा भूमिपुत्र विरुद्ध जावई अशी रंगतदार ठरली तर नवल नसावे!

श्रीपाद सबनीस, 

मुख्य संपादक, khabarbat.com | 9960542605

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like