khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Polit(r)ics : भगव्या उपरण्याची झप्पी!

 

विश्लेषण | श्रीपाद सबनीस

अर्थातच, अशोक चव्हाण यांच्यावर काही लिहावं इतका मी थोर नक्कीच नाही, पण मी नांदेडमध्ये बातमीदार म्हणून काम करताना त्यांना जवळून पाहता आलं, युथ काँग्रेसपासून त्यांनी चढत्या क्रमाने घडवलेली आजवरची राजकीय कारकीर्द पत्रकार म्हणून पाहिली. आज त्याची गोळाबेरीज मांडताना मला तीन बाबी प्रकर्षाने जाणवल्या. त्यापैकी एक म्हणजे श्रद्धा अर्थातच ‘श्रेष्ठी’वरची, दुसरी करीयर घडवताना प्रसंगोपात दाखवलेली सबुरी आणि तिसरी म्हणजे कार्यकर्ते, सामान्य जनतेत राखलेली आपुलकी. कोण काय म्हणेल, किंवा म्हणाले याकडे फारशा गांभीर्याने लक्ष न देता आपली वाट ते चालत राहिले. नव्या पिढीतल्या उमद्या तरुणांसाठी काही अपवाद वगळता अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायक ठरावा, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा घरोबा सोडला आणि भाजपचे कमळ हाती घेतले, अर्थातच याबद्दल अभिनंदन करायचे तर कोणाचे? असा प्रश्न मला साहजिकच पडला. अशोक चव्हाण यांचे करावे की, भाजपचे?

एक मात्र खरे, अशोक चव्हाण यांनी एकदाचा काय तो निर्णय घेतला, ते बरे झाले. त्यासाठी ते नक्कीच अभिनंदनास पात्र ठरतात. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात कोणीही पक्षातून बाहेर जाणार अशी वावडी उठली की, पहिल्यांदा अशोकरावांचे नाव चर्चेत असायचे. प्रत्येकास एखादा नेता जेव्हा संभाव्य फुटीर वाटत असतो तेव्हा त्या नेत्यांची पुण्याई किती हेही ध्यानात यावे.

भाजपने अशोक चव्हाण हे आपले संभाव्य लक्ष्य आहे याची हवा गेल्या काही वर्षात अशी काही निर्माण केली की, अजून काही दिवसांनी सोनिया वा राहुल गांधी यांनीच अशोकरावांस ‘‘तुमच्या भाजप प्रवेशाचे काय झाले’’, असे विचारले नसते तरच नवल!! आणि ही वेळ अशोकरावांनी आणली नाही; आणि ती येण्याच्या आधीच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. एकंदरीत आज ना उद्या अशोकराव भाजपात जाणार हे बहुधा जवळपास निश्चित असावे.

बिहारात नितीशकुमार यांची घरवापसी पुन्हा एकदा यशस्वी झाली असताना महाराष्ट्रातही अशोकरावांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यात फारसे आश्चर्य नाही. अशोकरावांच्या साथीने आणखीही काही आमदार भाजपमध्ये गेले तरीही आश्चर्य नसावे. आजकाल मूळ भाजपवासीयांपेक्षा अन्य पक्षांतील ज्येष्ठांना भाजपत बरे दिवस आले आहेत, हे खरे. अशोकराव तर माजी मुख्यमंत्री. याशिवाय माजी मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचेही ते सुपुत्र. म्हणजे डबल पॉवर. तेव्हा अशी व्यक्ती आपल्या गळाला लागली तर भाजप कशाला सोडेल? प्रश्न इतकाच की अशोकरावांचा घास घ्यायला इतका वेळ का लागला?

गेली काही वर्षे संभाव्य फुटिरांत अग्रमानांकित असलेल्या अशोकराव यांनी अखेर त्या दिशेने पहिले पाऊल टाकले. काँग्रेसचा राजीनामा दिला. तो देताना आपल्या आमदारकीचाही त्यांनी त्याग केला. आपली यानंतरची भूमिका लवकरच सांगू, दोन दिवस थांबा असे ते म्हणाले. याचा अर्थ इतक्या वर्षांच्या संभाव्य फुटीरतेच्या चर्चेनंतरही अशोकरावांस निर्णय घेण्यास अजून दोन दिवस हवे होते.

Advertise with us

तूर्त तरी भाजपला एका आज्ञाधारक नेत्याचा लाभ झाला, हे नक्की. काँग्रेसमधील आपल्या वास्तव्यात अशोकराव हे पक्षश्रेष्ठींचा माणूस म्हणूनच ओळखले जात असत. ही सवय त्यांना भाजपात अत्यंत उपयोगी पडेल. आणीबाणीच्या काळात अशोकरावांचे पिताश्री शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसचे तत्कालीन पक्षश्रेष्ठी संजय गांधी यांची पादत्राणे वाहिली होती. त्या वेळी त्यांच्यावर सडकून टीका झाली. पण शंकरराव चव्हाण बधले नाहीत, की त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नाही. पक्षप्रमुखांच्या चरणी निष्ठा वाहणे याचा हा वस्तुपाठ म्हणावा. अशोकरावांना तो भाजपतील भावी वास्तव्यात प्रगतिपथावर जोमाने घेऊन जाईल, हे निश्चित. महत्वाचे म्हणजे यानिमित्ताने तरी त्यांच्या मानेवरील आदर्श घोटाळ्याचे भूत कायमचे उतरवले जाईल. ‘आदर्श’ इमारतीच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने अशोकरावांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तेव्हापासून ते भूत त्यांच्या मानगुटीवर बसले ते बसलेच. आता त्यांची कुचंबणा कायमची दूर होईल. साधारणपणे १० वर्षांपूर्वी नांदेड येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा महिन्यांत अशोक चव्हाण यांस आदर्श घोटाळ्यासाठी तुरुंगात पाठवू असे आश्वासन मतदारांस दिले होते. तात्पर्य, सर्व घोटाळे करून, पचवून ताठ मानेने जगू इच्छिणा-यांसाठी सद्य:स्थितीत भाजपखेरीज अन्य पर्याय नाही, असाच तो संकेत होता. म्हणूनच कदाचित तोच पर्याय अशोकरावांनी निवडला.

अशोकरावांच्या येण्याने भाजपास मराठवाड्यात एक मराठा चेहरा मिळाला. मराठवाड्यात भाजपास तितकेसे स्थान नाही. कारण, त्यांची २०१९ पर्यंत शिवसेनेबरोबर युती होती. शिवसेनेस त्यामुळे मराठवाड्यात चांगले बस्तान बसवता आले. काँग्रेसचे स्थान मजबूत होतेच. मात्र काँग्रेसेतर मतदार मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे वळाले. त्या शिवसेनेकडील मतदारांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना त्यागाच्या माध्यमातून भाजपने करवून घेतला. शिंदे यांच्यासमवेत मराठवाड्यातील अनेक शिवसेना नेते भाजपशी हातमिळवणी करायला तयार झाले. या दोन पक्षांच्या तुलनेत भाजपास मराठवाड्यात विस्ताराची तितकी संधी मिळाली नाही. जेथे स्वत:चे नेतृत्व नाही, तेथे अन्य पक्षातील प्रस्थापित नेतृत्व आयात करण्यास भाजप बिलकूल कचरत नाही, हा इतिहास आहे. उदाहरणार्थ कोकण. ज्याप्रमाणे राणे पिता-पुत्रास भाजपने आपल्यात सामावून घेतले त्याप्रमाणे मराठवाड्यात अशोकरावांचे झाल्यास नवल नव्हते. आणि अशोकरावांस तसेही भाजपत जुळवून घेणे तितके अवघड जाणार नाही.

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राहण्यास जाण्याआधी अशोकरावांनी पुट्टपार्थी येथील सत्यसाईबाबांची पाद्यपूजा सरकारी इतमामाने सरकारी वास्तूत स्वहस्ते केली होती. आता त्यांच्या अशा पाद्यपूजादी गुणांचे चीज भाजपात होईल. ही भाजपाची गुणग्राहकता कौतुकास्पद ठरावी अशीच म्हणावी लागेल.

या गुणग्राहकतेकडे बघूनच अन्य पक्षातील मंडळींना जर एकदा भाजपकडे जावे असे वाटू लागले तर त्यात नवल कसले? उल्लेखनीय म्हणजे भाजप आगंतुकांचे स्वकीयांपेक्षा जास्त लाड करतो. याच मोहाने अधिकाधिक नेत्यांस भाजप म्हणूनच आपलासा वाटत असावा. आता त्या पक्षाने एकच करावे. साक्षात सोनिया गांधी वा निदान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाच भाजपवासी करून घ्यावे. नाही तरी भारत हा काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा त्या पक्षाच्या श्रेष्ठींनी केलेली आहेच. ती प्रत्यक्षात येण्यास यामुळे अधिक गती येईल. अशोकरावांचा ‘आदर्श’ अधिकाधिक काँग्रेसजन घेतील आणि डोक्यावरील गांधी टोपी उतरवून गळ्यात भगवे उपरणे मिरवू लागतील!

नोकरी विषयक माहितीसाठी … khabarbat.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like