ऑनलाइन ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंपनी सातत्याने कर्मचा-यांना कामावरून काढत आहे. यावर्षी देखील कामगिरीच्या आधारे फ्लिपकार्टने आपल्या किमान ५ ते ७ टक्के कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे १५०० कर्मचा-यांवर परिणाम होणार आहे. ऑनलाइन ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टद्वारे करण्यात येत असलेली ही कारवाई मार्च ते एप्रिल दरम्यान पूर्ण होईल.
गेल्या दोन वर्षांपासून कंपनी आपल्या कर्मचा-यांना कामगिरीच्या आधारे सातत्याने सेवामुक्त करीत आहे. कंपनीने वार्षिक कामगिरीच्या आढाव्याच्या आधारे कर्मचारी कपातीची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या वर्षभरापासून फ्लिपकार्टने नवीन नोकरीच्या संधी निर्माण केल्या नाहीत. सध्या कंपनीत सुमारे २२ हजार कर्मचारी काम करतात. कंपनीने ७ टक्के कर्मचारी सेवामुक्त करण्याचा निर्णय घेतल्यास सुमारे १५०० कर्मचा-यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म गेल्या काही काळापासून खर्चावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहेत.
फ्लिपकार्ट २०२४ मध्ये आयपीओ आणण्याच्या तयारीत व्यस्त आहे. कंपनी गेल्या आर्थिक वर्षापासून आयपीओ आणण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच कंपनीने अदानी समूहाकडून क्लिअरट्रिप खरेदी केली. वॉलमार्टकडून फ्लिपकार्टला मिळणारा $१ बिलियन फायनान्स पूर्ण होणार आहे. अलीकडच्या काळात, पे टीएम, मीशो आणि अमेझॉनसारख्या अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा मार्ग स्वीकारला आहे.