राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha reservation) लढा तीव्र होत आहे. अशातच राज्य शासनाकडून मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदीची तपासणी सुरू आहे. एकट्या जालना (jalna) जिल्ह्यात आतापर्यंत २७ वर्षांच्या रेकॉर्ड तपासणीत तब्बल ३ प्रकारच्या २,५०० नोंदी निदर्शनास आल्या आहेत.
विशेष म्हणजे तीन प्रकारच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे आता ता. १२ ऑक्टोबर रोजी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अजून काय नवीन सुचना मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
जालन्यातील अंतरवाली सराटी (antarwali sarati) (ता.अंबड) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे (manoj jarange) पाटील यांनी सरसकट मराठा कुणबी प्रमाण पत्र देण्याची मागणी केली होती. त्यानंतर महिनाभरात मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे सांगत उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची समजुत काढण्यास मुख्यमंत्री (cm eknath shinde) एकनाथ शिंदे यांना यश आले होते.
मराठा आरक्षणाचा (maratha reservation) प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती ही गठीत करण्यात आली. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने निजामी राजवटीच्या काळातील नोंदी तपासण्याचे काम महिनाभरापासून सुरू होते.
एकट्या जालना (jalna) जिल्ह्यात मागील महिनाभरात २७ वर्षातील १७ ते १८ लाख दस्त तपासणी केल्यानंतर सुमारे २,५०० नोंदी आढळल्या आहेत. विशेष म्हणजे नोंदीमध्ये कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा तीन प्रकराच्या नोंदी आहेत.
या नोंदीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून १२ ऑक्टोबर रोजी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीकडे सुपूर्त केला जाणार आहे. शिवाय या समितीकडून नागरिकांकडून नोंदीचे पुरावे ही स्वीकारले जाणार आहेत.
प्रशासनाला जुन्या रेकॉर्डमध्ये कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी मिळाल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढील काही काळात कायमस्वरूपी मार्गी लागण्याचे सकारात्मक चिन्हे दिसून येत आहेत.
१९४० ते १९६७ दरम्यानच्या नोंदी
जिल्हा प्रशासनाने मागील महिनाभरात १९४० ते १९६७ या २७ वर्षातील १७ ते १८ लाख दस्तांची तपासणी केली. या दरम्यान सुमारे २,५०० (kunbi) कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदी दिसून आल्या आहेत.
निजामकालीन आणि स्वातंत्र्योत्तर नोंदी
प्रशासनाकडून तपासण्यात आलेल्या दस्तांमध्ये १९४० ते १९४८ दरम्यान निजाम राजवटीतील रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. या रेकॉर्ड तपासणीमध्ये कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी आढळुन आल्या आहेत. शिवाय ता. १७ सप्टेंबर १९४८ नंतर मराठवाडा निजाम (nijam) राजवटीतून स्वतंत्र झाला. त्यानंतर १९६७ पर्यंतच्या रेकॉर्डमध्ये कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. मात्र, १९६९ नंतर कायद्यात बदल झाल्यानंतर या नोंदी पुढे राहिल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.
१३५० फसलीमध्ये नोंदी
जालना जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील १२ गावांमध्ये कुणबी मराठा नोंदी मिळाल्या होत्या. यात सन १३५० फसलीपासून ते १९५४-५५ पर्यंत रेकॉर्डमध्ये या नोंदी आढळुन आल्या होत्या. यामध्ये घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, रवना, वडीरामसगाव, जाफराबाद तालुक्यातील मेरखेडा, भोकरदन तालुक्यातील वालसावंगी, बदनापूर तालुक्यात किन्होळा, अंबड तालुक्यातील दहीपुरी, दाढेगाव, बारसवाडा, जालना तालुक्यातील वस्तीगव्हाण (मोतीगव्हाण) निरखेडा, धांडेगाव या गावांचा त्या अहवालात समावेश होता.
शिंदे समितीच्या सूचनांकडे लक्ष
जालना (jalna) जिल्ह्यात २,५०० कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी आढळल्या आहेत. याचा अहवाल निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीकडे सादर केल्यानंतर यावर समिती या अहवालाचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर या समितीकडून प्रशासनाला काय सूचना येणार? मराठा आरक्षणासंदर्भात समिती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.