मुलाखत : राजेंद्र घुले
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसापासून बेमुदत उपोषणास बसलेले आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालल्याने त्यांच्यावर उपोषणस्थळीच औषधोपचार सुरू आहेत. दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाच्या निर्धारास त्यांच्या कन्येनेही बळ दिले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे दिनांक २९ ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत. उपोषणस्थळी दिनांक १ सप्टेंबर रोजी झालेल्या लाठीचार्ज व गोळीबाराचे पडसाद राज्यभरात उमटल्याने अंतरवाली सराटी हे गाव मराठा समाजासह इतर समाजाच्या नेते मंडळी व सामाजिक संघटनांचे लक्ष वेधून घेत आहे.
राज्यातील बडे नेते मंडळींनी अंतरवाली सराटी येथे जावून मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले आहे. सरकारने पाठविलेल्या शिष्टमंडळाला जरांगे यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यात यश आलेले नाही. मनोज जरांगे यांची उपोषणामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर उपोषण स्थळीच औषधोपचार सुरू आहेत. जरांगे यांनी कोणत्याही परिस्थितीत उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे.
पित्याच्या निर्धाराला कन्येचे बळ!
बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे रहिवासी असलेले व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी २० वर्षापासून लढा देत असलेले मनोज जरांगे हे अंकुशनगरात राहतात. त्यांचे वडील रावसाहेब जरांगे हे गावाकडे शेती करतात. जरांगे यांना तीन मुली व एक मुलगा आहे. मुलगा शिवराज हा बीटेक करतोय. दोन मुली बाहेरगावी शिक्षण घेत आहेत.
गेल्या १५ दिवसापासून बेमुदत उपोषणास बसलेले आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा परिवार चिंतेत असला तरी जरांगे यांच्या उपोषणाच्या निर्धारास बळ देत आहे. त्यांची मुलगी पल्लवी हिने सरकारने वडिलांच्या मागणीकडे लक्ष द्यावे, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आपले वडील जिद्दी आहेत, त्यांच्यात चिकाटी आहे. ते माघार घेणारे नाहीत. आपल्या वडिलांच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास त्यास सरकारच जबाबदार राहील, असा इशारा देणारी पल्लवी हिने आपल्या वडिलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण आरक्षण मिळेपर्यंत सुरूच ठेवावे, त्यांनी माघार घेऊ नये, असे आवाहन केले आहे. पल्लवी हिने भविष्यात आयपीएस होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा यांनीही जरांगे यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली असून आपले पती जिद्दी असल्याने ते माघार घेणार नाहीत, सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. शिवराज जरांगे याने मराठा समाजास आरक्षणाची गरज असल्याचे सांगून आपल्या वडिलांनी प्रकृतीकडे लक्ष देऊन आरक्षण मिळेपर्यंत आपला लढा सुरू ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रसार माध्यमाशी बोलतांना जरांगे यांच्या कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. शुक्रवारी जरांगे यांच्या आईचे उपोषणस्थळी डोळे भरून आले होते.