महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी (ssc)-बारावी (hsc)च्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर १० वीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत SSC-HSCची लेखी परीक्षा घेण्यात येते. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेचा कालावधी राज्य मंडळाने जाहीर केला. त्यानुसार बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्षी विषय आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित केली आहे.
सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी website : www.mahahsscboard.in
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर SSC – HSC दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या हेतूने लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.