दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी!
राज्यात पुरेसा पाऊस नाही, सरकारकडून कोणती मदत नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीमुळे मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात असल्याची माहिती शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील जाहीर सभेत दिली. शिवसेनेतील फाटाफुटीनंतरची नांदेड येथील ही पहिलीच सभा होती. दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी रुपयांचा निधी तयार ठेवला आहे.

राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीच्या २९ टक्के पाऊस झाला. सद्य:स्थितीत ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडला, त्यामुळे दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. भीमा खो-यातील २६ धरणांमध्ये सध्या १४८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे, कोकण वगळता राज्यातील १८ जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे.
कोकण विभाग वगळता नाशिक, धुळे, नगर, सोलापूर, जळगाव, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली व औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई अनेक गावांमध्ये निर्माण झाली असून शेतीला पाणी न मिळाल्याने पिके करपली आहेत.
कृषी विभागाकडून पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यानंतर कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडून पिकांची पाहणी होईल. शेवटी पावसाचा खंड व पिकांचे नुकसान, यावर आधारित एकूण संभाव्य नुकसानीच्या २५ टक्के रक्कम पिकविम्यातून शेतक-यांना मिळेल. सप्टेंबरमध्येही पावसाने दडी मारल्यास ऑक्टोबरमध्ये दुष्काळी तालुके जाहीर होतील. तत्पूर्वी, राज्य सरकारने ‘एसडीआरएफ’मधून (राज्य आपत्ती निवारण निधी) ८ हजार कोटी रुपये उपाययोजनांसाठी तयार ठेवले आहेत.
बँकांचे पीक कर्जवाटप ठप्प…
कर्जमाफीतील दोन लाखांवरील थकबाकीदारांच्या बाबतीत राज्य सरकारने अजूनही काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बँकांची विशेषत: जिल्हा मध्यवर्ती बँकांची थकबाकी ‘जैसे थे’ आहे. कर्जवसुलीसाठी प्रयत्न होत असतानाच पावसाने ओढ दिल्याने वसुलीही ठप्प झाली आहे. खरीप हंगामात यंदा ७० हजार कोटींचे कर्जवाटप अपेक्षित होते, पण आतापर्यंत बँकांनी ५० ते ५४ हजार कोटींचेच कर्जवाटप केले आहे.
दरम्यान, ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा अर्थ या मोसमाच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत मान्सून अल्प पावसाने संपेल.
युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग, यूकेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सच्या ताज्या ट्रेंडच्या आधारे असा अंदाज व्यक्त केला आहे की, सप्टेंबरमध्ये भारतातील ३६ पैकी ३२ हवामान उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९४% किंवा त्यापेक्षा कमी पाऊस असेल. सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा २० मिमी कमी असेल. तथापि, आयएमडीने जुलैच्या अखेरीस आपल्या मध्य-मान्सूनच्या अंदाजात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
६ राज्यांमध्ये कमी पाऊस
हवामान विभागानुसार, देशातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत सरासरी पाऊस झाला आहे. त्याच वेळी, अशी ६ राज्ये आहेत जिथे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. येत्या मार्च-एप्रिलपर्यंत एल निनो या स्थितीत राहण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे, अशात मान्सूननंतर कमी पाऊस पडेल व हिवाळ्यात त्यानंतर पुढील वर्षीच्या मान्सूनपूर्वी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.