चीनचे परराष्ट्र मंत्री किन गॅंग, ज्यांची अलिकडेच हकालपट्टी करण्यात आली, ते बेपत्ता आहेत. एक-दोन नव्हे, तर तब्बल महिना होऊन गेला तरीही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांच्या गायब होण्याचे गूढ अधिक वाढत चालले आहे.
चीनमध्ये माणसे बेपत्ता होणे तशी सामान्य बाब आहे, कम्युनिस्ट पक्षाची मर्जी हटली कि, मोठमोठी माणसे गायब व्हायला लागतात. हा किस्सा त्यापैकीच एक असला तरी त्याला प्रेमाची किनार आहे, हे विशेष !
अर्थातच प्रेम कुणावर जडावं, त्याचे परिणाम कसे आणि काय घडावेत, ह्याला काही लॉजिक नसतं. देखण्या, ऐटबाज (Qin Gang) किन गँगच्या बाबतीतही असेच काहीसे झाले. किनच्या आयुष्यात तितकीच स्मार्ट, ग्लॅमरस फू (Fu) आली. तो तिच्यावर फिदा झाला. अन तिने इश्काच्या जाळ्यात फुल्ल ‘गुल’ केले.
हॉंगकॉंगमधील एशिया सेंटिनेल हा ब्लॉग वगळता जगभरातील बहुतेक माध्यमे या दोघांचा प्रेम-राग आळवत बसली आहेत. गँगच्या गायब होण्यामागे फू शिओतिआन या टीव्ही वरील ग्लॅमरस अँकरशी असलेले प्रेमसंबंध कारणीभूत असल्याचा त्यांचा तर्क आहे. तर, हेरगिरीसाठी लावलेला हनीट्रॅप कारणीभूत असल्याचा दावा एशिया सेंटिनेलने केला आहे.
आता ही फू आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असणार…
तर, ही फू (Fu) शिओतिआन एक डबल एजंट आहे, एशिया सेन्टिनेलच्या म्हणण्यानुसार ती एकाच वेळी चीन व पाश्चात्य देशांसाठी काम करते. एक हायप्रोफाइल आणि ग्लॅमरस टीव्ही अँकर आहे. एक प्रसिद्ध मुलाखतकार आहे. ती चीन सरकारच्या फिनिक्स टीव्हीवर Talk with World Leaders नावाचा कार्यक्रम करायची.
या कार्यक्रमात तिने आतापर्यंत हेनरी किसिंजर, शिंझो आबे, जॉन केरी, बान की मून, बशर अल असद अशा अनेकांच्या मुलाखती घेतल्या. तिने शेवटची मुलाखत मार्च २२ मध्ये घेतली, जी किन गँग यांची होती. त्यावेळी ते अमेरिकेतील चीनचे राजदूत होते.
या फू चे प्रारंभीचे शिक्षण चीनमध्ये झाले. ती केंब्रीजमध्ये चर्चील कॉलेजची विद्यार्थीनी होती. तिने या कॉलेजला मोठी देणगी दिली, त्यामुळे कॉलेजने २०१६ साली एका बागेला फू (Fu) शिओतिआन गार्डन असे नाव दिले. तिच्या टीव्हीवरच्या मुलाखतीच्या कार्यक्रमामुळे “आंतरराष्ट्रीय सामंजस्य” वाढीस लागले असा गौरवही चर्चिल कॉलेजने केला. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे २०१७ साली इटलीचे अध्यक्ष सर्जीओ मातारेला यांनी फू ला Order of Stella d’Italia (Star of Italy) हा किताब प्रदान केला.
फू ने फिनिक्स टीव्हीसाठी इटलीच्या दोन पंतप्रधानांची, अध्यक्षांची आणि परराष्ट्र मंत्र्यांची मुलाखत घेतली होती. २०२० मध्ये उत्कृष्ट माहितीपटासाठीच्या एमी अवार्ड समारंभात तिला पुरस्कार प्रदान करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. हे सर्व एका टीव्ही निवेदिकेला इतक्या कमी वयात मिळावे याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. ती ४० वर्षांची आहे.
चर्चिल कॉलेजला देणगी आणि बागेला फू (Fu) चे नाव दिले जाण्यात चीन सरकारचा हात असावा असा एक मतप्रवाह आहे. चीन अशा देणग्या राजकीय हेतूने देते हे स्पष्ट आहे. त्यावेळी फू टीव्ही अँकरच्या रुपात चीन सरकारसाठी काम करत असावी असा तर्क आहे. पण अशा देणग्या चीन का देते, हे ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेला माहीत नसेलच असे नाही. त्यामुळे त्यांनी फू ला आपल्या यंत्रणेत ओढले असण्याची देखील शक्यता आहे.
फू चे गॅंग (Qin Gang) सोबत असलेल्या प्रेमसंबंधातून काही गुप्त माहिती अमेरिका किवा ब्रिटनकडे त्याने उघड केली असावी असा तर्क लावला जात आहे. त्यातूनच गॅंग यांची परराष्ट्र मंत्रीपदावरून हकालपट्टी केली असावी, असा अंदाज सेन्टिनेलने व्यक्त केला आहे.
उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी चीनच्या रॉकेट फोर्सचे कमांडर ली युचाको हे देखील असेच गायब झाले होते. त्यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षण घेत होता व त्याच्यामार्फत ली यांनी काही गुपिते अमेरिकेला विकल्याचा आरोप होता.
रॉकेट फोर्सचे डेप्युटी कमांडर वू गुहोआ हे मेंदूतील रक्तस्त्रावाने मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले, पण ली यांच्या या प्रकरणासंबंधात त्यानाही अटक करण्यात आली होती व त्यांनी आत्महत्त्या केली असल्याचे सांगितले जाते.
खरे तर किन गॅंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विश्वासातले. शी आणि गॅंग (Qin Gang) दोघांच्याही पत्नी मध्ये चांगला स्नेह असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे गॅंग हे एक असे नेते होते की, ज्यांचे शी जिनपिंग यांच्याशी वैयक्तिक संबंध होते. पण गॅंग यांनी फू मार्फत काही गुपिते फोडली असतील तर शी त्यांना माफ करतील असे नाही.