भारताचे तिसरे चांद्रयान आज (दि. १४ जुलै) चंद्राच्या दिशेने झेपावले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन सेंटरवरून दुपारी २ वाजून ३५ मिनीटांनी त्याने उड्डाण केले. चांद्रयान- ३ ला चंद्राजवळ पोहोचण्यासाठी दीड महिन्यापेक्षा जास्त वेळ लागेल. येत्या २३, २४ ऑगस्टपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर ते लँडींग करेल.

चांद्रयान सोबत असलेले विक्रम लँडर तिथे सुरक्षित आणि सहज सुलभपणे उतरू शकले तर भारत हा जगातला पहिला आणि चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरवणारा चौथा देश ठरेल. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले आहेत.
सध्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. एकटा भारतच नव्हे, तर अमेरिका, चीन देखील आपली नजर रोखून आहे. काही वर्षांपूर्वी चीनने दक्षिण ध्रुवावरून काही अंतरावर लँडर उतरवला होता. आता अमेरिका दक्षिण ध्रुवावर पुढच्या वर्षी अंतराळवीर पाठवण्याची तयारी करत आहे.
आता प्रश्न असा पडतो कि, साऱ्या जगाचे दक्षिण ध्रुवाकडे लक्ष का लागले असावे?
महत्वाची बाब म्हणजे जसा पृथ्वीला दक्षिण ध्रुव आहे तसाच चंद्राला आहे. पृथ्वीचा दक्षिण ध्रुव अंटार्क्टिका आहे. जो सगळ्यात थंड प्रदेश आहे. त्याचप्रमाणे चंद्राचा दक्षिण ध्रुव देखील थंडगार आहे.
या ठिकाणचे तापमान कमी असण्याचे कारण म्हणजे जर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणी उभा राहीला, तर त्याला सूर्य क्षितीजावर दिसतो. थेट सूर्यकिरणे येथे पोहोचत नाहीत त्यामुळे येथे वातावरण गारेगार असते.
एक तर्क असा आहे कि, सतत सावली असणाऱ्या भागात पाणी किंवा खनिज असण्याची शक्यता गृहित धरली जाते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबाबतही असाच विचार होत आहे.
‘नासा’ या अंतराळ संस्थेच्या माहितीनुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ आहे. इथे इतर नैसर्गिक संसाधन असण्याची शक्यता आहे. नासाने १९९८ मध्ये चांद्रयान मोहीम केली. त्यावेळी सांगितले की, चंद्रावर हायड्रोजन असणे म्हणजेच तिथे बर्फ असण्याचा तो पुरावा आहे.
बर्फ किंवा पाणी मिळाले तर?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील रहस्यांपासून सारे जग अजून अनभिज्ञ आहे. एक शक्यता अशी आहे कि, इथे गोठलेले पाणी अब्जावधी वर्षांपूर्वीचे असू शकते. त्यामुळे सौरमंडलाविषयी बरीच महत्वपूर्ण माहिती मिळण्यास वाव आहे.
इथे जर पाणी किंवा बर्फ मिळाले तर यामुळे सौरमंडलात पाणी आणि इतर पदार्थ कसे फिरत आहेत याचा अंदाज लावणे शक्य होऊ शकते. आपल्याला पाण्याचा अजून एक पर्याय मिळू शकतो.