अखेर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. याच सोबत दिलीप वळसे पाटील यांच्याकडेही महत्वाचे खाते दिले जाणार आहे.
गुरूवारी (१४ जुलै) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत खातेवाटपाचा तिढा सुटला, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली.
एकीकडे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मतभिन्नता असल्याची राजकीय वर्तुळात सुरु होती. दुसऱ्या बाजुला शिंदे गटातील आमदारांकडून व्यक्त होणारी नाराजी त्यास अधिक दुजोरा देत होती. खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सतत बैठकांचे सत्र सुरु होते.
नव्या राज्य मंत्रिमंडळात सहकार खाते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले जाणार अशी माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे ही दोन्ही खाती यापूर्वी भाजपकडे होती. भाजपने ही खाती आता राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडली आहेत.
खाते वाटपात ‘दादा’गिरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकंदील ४ खाते राष्ट्रवादीला द्यावी लागली आहेत. त्यात १) परिवहन, २) कृषी, ३) सामाजिक न्याय, ४) अल्पसंख्यांक यांचा समावेश आहे. तसेच भाजपने पाच खाती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडली. त्यात १) अर्थ, २) सहकार, ३) महिला आणि बाल कल्याण, ४) अन्न व नागरी पुरवठा, ५) क्रीडा व युवक कल्याण या खात्यांचा समावेश आहे.
खरे तर निधी वाटपात दुजाभाव केल्याच्या कारणावरून अजित पवार यांच्याविषयी नाराजी व्यक्त करीत ‘मविआ’ सरकारमधून आणि शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांचा अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध होता. परंतु, अजित पवार यांनी अर्थ खात्याचा आग्रह कायम ठेवला होता.
अजित पवार गटाला मिळणारी खाती आणि मंत्री
अर्थ – अजित पवार, कृषी – छगन भुजबळ, सहकार – दिलीप वळसे पाटील, परिवहन – धर्मराव अत्राम, सामाजिक न्याय – धनंजय मुंडे, अन्न नागरी पुरवठा – अनिल पाटील, महिला बाल कल्याण – अदिती तटकरे, क्रीडा – संजय बनसोडे, अल्पसंख्यांक – हसन मुश्रीफ