khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

बाईपण भारी… सहा बायकांच्या सहा तऱ्हांची कहाणी!

A practise shot of Baipan bhari deva

विश्लेषण / श्रीपाद सबनीस

बाईपण भारी देवा ! हा चित्रपट सर्व स्तरात आणि सर्व वयोगटात सध्या चर्चेत आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे महिला-पुरुष या दोन्ही वर्गातील सर्व वयोगटाची नाडी या चित्रपटाच्या संहितेत अचूकपणे हेरली गेली आहे. अगदी पहिल्या फ्रेम पासून ते अखेरच्या फ्रेम पर्यंत प्रेक्षकांना ती खिळवून ठेवते. हसत-खेळत सुरु झालेल्या या चित्रपटाचा प्रवास आपल्याच कळत न कळत डोळे भरून पाहू लागतो, यातच त्याचं यश दडलेलं आहे. असं मला वाटतं.

एकीकडे बाईपणाची दुखरी नस पकडून ठेवत असतानाच दुसऱ्या बाजूला स्वतःसाठी जगण्याची प्रेरणा आणि बळ हा चित्रपट देतो, आज प्रत्येक थिएटरमध्ये त्याचेच उत्स्फूर्त प्रत्यंतर पाहायला मिळते आहे. हा चित्रपट महिलांप्रमाणेच पुरुषांनीही पाहिला पाहिजे,  का?? त्याची ५ कारणे आहेत. त्याचेच पोस्टमार्टेम मी येथे केले आहे. महत्वाचं म्हणजे पुरुष असो कि स्त्री त्यांच्या नात्यात, व्यक्तिमत्वात दडलेला अहंकार खुबीने मोडून काढता येतो ही शिकवण हा चित्रपट देतो.

गैरसमजातून नात्यांमध्ये आलेला दुरावा आणि तो दूर करण्याचा प्रयत्न हे बाईपण भारी… चे कथा-बीज आहे. सहा बहिणींमध्ये कधी तरी त्यांच्यात दिसण्यावरून, असण्यावरून, छोट्या-मोठ्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होणं आणि ते आयुष्यातल्या विविध टप्प्यावर कॅरी फॉरवर्ड होत राहणं, त्यातून दीर्घ काळासाठी दुरावा निर्माण होऊन एकटं पडणं आणि मग एकत्र येणं, त्यांच्यात आपुलकी निर्माण होणं असं म्हटलं तर सहज, साधं पण म्हटलं तर भारी पडेल असंच कथानक आहे.

चित्रपटाची वीण घट्ट आहे. त्यातला कार्यकारणभाव एक दोन वेळा हलतो, पण एरवी ती वीण व्यवस्थित पकडून ठेवलीय, म्हणूनच चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खुर्चीला बांधून ठेवते. आणखी एका बाबीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे प्रत्येक महिलेच्या मनाच्या गाभाऱ्यात मंगळागौरीची एक हळवी स्पेस असते. त्या स्पेसमध्ये मंगळागौर स्पर्धेची संकल्पना चपखल सेट केलीय. अतिशय खुमासदार पद्धतीने वातावरणनिर्मितीसाठी या स्पर्धेचा केलेला वापर बाईपण भारी… ला आभाळाएवढी उंची देतो. यापूर्वी दे धक्का या चित्रपटाला डान्स कॉम्पिटिशनने वेगळे परिमाण मिळवून दिलेले आपणास आठवतच असेल.

baipan bhari deva

बाईपण भारी… मध्ये बाईपणाच्या आधुनिक कल्पना नाहीत; म्हणूनच स्पर्धेत उतरता आलं नाही, हा निगेटिव्ह कॉम्प्लेक्स दारू पिण्याचा अवघ्या ३ मिनिटांचा प्रसंग सिनेमात घेऊन येतो. कार्यकारणभावाला चक्क फाटा देतो. या एका सीनमधून दिग्दर्शकाने अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर उभ्या केल्या, तसेच पुढच्या अनेक शक्यता निर्माण केल्या. दारू न पिताही रेल्वेस्टेशनवर मंगळागौर कशी असते हे  दाखवता आलं असतं आणि दाखवलं असतं तरी फारसा कोणी आक्षेप घेतला नसता. पण मुळात ती मुलं तिथे येऊन नाचतात हे पाहताना आगळी रंगत आणि गंमत येते.

मला तरी नात्याच्या प्रवाहीपणाला दिलेलं महत्त्व अधिक गहिरं वाटलं. खरं तर ही सहा बायकांच्या सहा तऱ्हांची कहाणी आहे. त्यांचा आपला आपला संघर्ष इथे आहे. आणि या संघर्षात आपल्या माणसांची साथ मिळाली तर माणूस लवकर तरून जातो हा एक महत्वाचा मेसेज प्रेक्षकांसाठी आहे. खरं तर सिनेमा एवढाच आहे. आधी हलकाफुलका वाटणारा सिनेमा नंतर एक चांगला संस्कार प्रेक्षकांच्या मनात हळुवारपणे रुजवतो. एकेकीचा अभिनय आपली नजर पडद्यावरून हलू देत नाही. त्यांचं सिनेमात असणं किती अपरिहार्य होतं, हे सिनेमा पाहताना  उमगत जातं, या सहा जणींनी बाईपण भारी… मधली पात्रं जणू जगली आहेत. इतकी सहजता त्यांच्या अभिनयातून जाणवते. एकंदरीत, या बलस्थानांमुळेच ‘बाईपण… ‘ खऱ्या अर्थाने भारीच पडलं आहे.

आपली जाहिरात येथे देऊ शकता…   संपर्क : 9960542605 

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »