पंढरपुरात आज (२९ जून) आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी २५ वर्षांपासून नियमित वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला.
आज प्रथम विठ्ठलाच्या (Lord Vitthal) मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची सपत्नीक महापूजा केली. विठ्ठलाच्या महापूजेनंतर मुख्यमंत्री आपले कुटुंब व मानाचे वारकरी काळे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. तिथे त्यांनी रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक करून त्यांचीही पूजा केली.
काळे दाम्पत्याला महापूजेचा मान
भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल हे अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडीहून वारीसाठी आले होते. त्यांना यंदा मुख्यमंत्र्यांसोबत (Lord Vitthal) महापूजेचा मान मिळाल्याने त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. हे शेतकरी वारकरी कुटुंब मागील २५ वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहे.