khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Adani : ‘भुल-भुलय्या’ने दिला अखेर अदानींना नारळ !!

 

विश्लेषण / श्रीपाद सबनीस

कदाचित आता असेही म्हटले जाईल कि, गौतम अदानीच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या आर्थिक साम्राज्याला जणू दृष्ट (नजर) लागली; किंवा अदानी समूहाचा विस्तार लोकांना देखवला नाही. त्यामुळे या समूहाची पडझड सुरु झाली आहे. या आर्थिक दुखण्यावर काही मंडळींनी राजकीय उतारा एव्हाना सुचवला असेल, किंबहुना हा तोडगा करूनही झालेला असेल. मात्र, महिनाभरापासून अदानी समूहाची पडझड काही केल्या थांबत नाही.

हे विश्लेषण लिहीत असतानाच (दुपारी २:३० वाजेच्या सुमारास) अदानींची एकूण संपत्ती आता ४२.७ अब्ज डॉलरवर आली होती. यासोबतच त्यांना जगातील TOP २५ श्रीमंतांच्या यादीतूनही नारळ मिळाला. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात त्यांची २९ व्या स्थानावर घसरण झाली आहे.

ब्लूमबर्गच्या यादीनुसार, जगातील १० श्रीमंतांच्या यादीत सध्या एकही भारतीय नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी ८१.५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १२ व्या स्थानावर आहेत. तर फ्रान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट हे १८९ अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत. अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर आहेत, त्यांची एकूण संपत्ती १८३ अब्ज डॉलर एवढी आहे.

एकंदरीत, अदानी ग्रुपच्या अनेक समभागांनी आता ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. यामुळे अदानी ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे १४२ अब्ज डॉलरची घट नोंदवण्यात आली आहे.

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल २४ जानेवारी २०२३ आला. तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने मोठी घसरण सुरु आहे. अदानी समूहाचे ७ शेअर्स सुमारे ८५ टक्क्यांनी घसरले आहेत, असे त्यावेळी हिंडेनबर्गने म्हटले होते.

धक्कादायक बाब म्हणजे या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये गेले आहेत. हे उल्लेखनीय ठरावे. अदानी समूहाचे सर्व शेअर्स लाल चिन्हावर आले. महत्वाची बाब म्हणजे गेल्या एका महिन्यात अदानी समूहाचे ३ शेअर्स ८५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.

अदानी समूहाच्या अडचणीत दिवसेंदिवस नव-नवी वाढ होत आहे, आणि याचे पडसाद परदेशातही उमटत आहेत.

‘गार्डियन’चा रिपोर्ट म्हणतो…

‘द गार्डियन’च्या माहितीनुसार अनेक ऑस्ट्रेलियन रिटायरमेंट फंडांनी गौतम अदानी यांच्या कंट्रोलिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यात क्वीन्सलँडमधील सरकारी कर्मचारी आणि कॉमनवेल्थ बँकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम ऑस्ट्रेलियाच्या रिटायर्ड सेव्हिंग्जवर होत आहे.

ऑस्ट्रेलियन रिटायर्ड सेव्हिंग फंडांनी अदानी समूहातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. यामध्ये २४३ अब्ज डॉलरच्या फ्युचर फंडाचाही समावेश आहे. देशाची दीर्घकालीन आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या फंडानी देखील अदानी समूहातील दोन कंपन्यांमध्ये पैसा ओतला. मात्र अदानी समूहातील संकटामुळे आता त्यांचे मूल्य मूळ गुंतवणुकीपेक्षा खूपच कमी झाले आहे.

याशिवाय ब्रिस्बेनच्या ऑस्ट्रेलियन रिटायरमेंट ट्रस्टची अदानी समूहाच्या ६ कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे. अदानी समूहाचे ऑस्ट्रेलियातही दोन प्रकल्प सुरु आहेत. यामध्ये कारमाइकल कोळसा खाण आणि क्वीन्सलँडमधील रेल्वे प्रकल्पाचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियन रिटायरमेंट ट्रस्टचे मुख्यलाय ब्रिस्बेन येथे असून त्यांनी किमान ६ अदानी कंपन्यांमध्ये १ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली. तर ऑस्ट्रेलियन रिटायरमेंट ट्रस्टकडे $२०० अब्ज पेक्षा जास्त मालमत्ता आहे.


अर्थातच या देशाला आर्थिक महासत्ता होण्याचे धुमारे जसे फुटत राहिले, जसे-जसे ती स्वप्ने राजकीय अर्थाने रंगत राहिली तसे पडद्यामागे अनेक गोष्टी घडत होत्या. आणि हा सारा इफेक्ट पहायला मिळतो आहे, तो त्याचीच एक परिणीती म्हणता येईल. मुळात अदानी समूहाचा मूलाधार हा व्यावसायिकता आहे. त्यामुळे व्यक्तिशः गौतम अदाणी असोत कि त्यांचा संस्थात्मक समूह यांनी जे काही केले ते व्यवसाय या अर्थानेच. मग ते फेरफार, अति मूल्यांकन असो कि आणखी काही… व्यापार आणि व्यवसायात अशा बाबी नगण्य ठरतात, हे काही प्रमाणात गृहीत असते. मात्र नेमका हाच ‘भुल-भुलैय्या’ अदानींच्या बिझनेसला नडला (अडसर ठरला) आहे.

म्हणूनच अदानी समूहाचा आणखी एक शेअर जो ७९ टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

अदानी समूहाच्या कोणत्या शेअर्समध्ये किती घसरण झाली ते समजून घ्या….

८५ % पेक्षाही अधिक घसरलेले शेअर्स …

अमेरिकन रिसर्च फर्मचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. गेल्या एका महिन्यात हे शेअर्स ८५ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

अदानी समूहाच्या सर्व १० कंपन्यांच्या शेअर्सचे भाव सातत्याने घसरणीवर आहेत. अदानी टोटल गॅसचे शेअर्स २५ जानेवारीपासून सातत्याने घसरत ८३५ रुपयांवर बंद झाले. हिंडेनबर्गने अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सचे अतिमूल्यांकन केल्याचा आरोप केला होता.

२४ जानेवारीपासून अदानी टोटल गॅसच्या बाजारमूल्यात ३.३५ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. ४.३ लाख कोटी रुपयांवरून, त्याचे मार्केट कॅप आता १ लाख कोटी रुपयांवरून ९१,८२९ कोटी रुपयांवर आले.

८२ टक्क्यांनी घसरण …

बीएसईच्या आकडेवारीनुसार बुधवारी (२२ फेब्रुवारी २०२३) अदानी ग्रीनचा शेअर ५३९ रुपयांवर बंद झाला होता. गुरुवारी (२३ फेब्रुवारी) तो घसरणीसह ५१२.१० रुपयांवर उघडला. या शेअरमध्ये लोअर सर्किट दिसून येत आहे.

अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ८२% खाली घसरला आहे. त्याच बरोबर, अदानी ट्रान्समिशनचा शेअर ही ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ८१% खाली आला आहे.

अदानी समूहाची मोठी घसरण ….

शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये २२ फेब्रुवारी (बुधवारी) रोजी मोठे नुकसान झाले. BSE वर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स १०.४३ टक्क्यांनी घसरून १,४०४.८५ रुपयांवर बंद झाले.

अदानी पोर्ट्सचे शेअर्स ६.२५ टक्क्यांनी, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅसचे शेअर्स ५ टक्क्यांनी खाली आले. अदानी ग्रीन एनर्जी ४.९९ टक्के, अदानी विल्मार ४.९९ % आणि अंबुजा सिमेंट्स ४.९२ % तसेच NDTV चे शेअर्स ४.१३ टक्क्यांनी घसरले.

एकुणात या साऱ्या प्रकरणाचा साकल्याने विचार करता जगातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून याकडे पाहिले गेल्यास आश्चर्य वाटू नये !!

तुमच्या उपयोगाची बातमी- khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »