जैैन उद्योग समुहातील विविध कृषी संशोधन केंद्रांनी केलेले प्रयोग, पीक लागवडीचे प्रात्यक्षिक, नवतंंत्राचा वापर, शिवार भेटी आणि कृषी संशोधकांकडून थेट शंका निरसन अशा कृषीज्ञान संवर्धन यात्रेचा शेतकऱ्यांना नेमका लाभ काय होणार आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे.
‘जैन’ मधील सर्व प्रकारच्या कृषी संशोधनाची पाहणी करण्याची संधी शेतकऱ्यांना १५ मार्च २०२३ पर्यंत उपलब्ध आहे. गाव किंवा तालुकास्तरावर असलेल्या ‘जैन’ उत्पादने व सेवांच्या वितरकांमार्फत रोज किमान १ हजार शेतकऱ्यांना संशोधन व प्रात्यक्षिक शिवारात आणले जात आहे. शेतकऱ्यांसाठी प्रवास, नाश्ता, भोजन अशी व्यवस्था ‘जैन’ तर्फे केलेली आहे.
शेतकऱ्यांना कृषी व्यवस्थेत नवी दृष्टी, नवी दिशा आणि नवा विचार देण्याचा प्रयत्न या उपक्रमाचा आहे. शेतीच्या पारंपारिक पद्धतीत बदल करणे, कमी जागेत जास्त लागवड, नवतंत्र वापर करून उत्पादन वाढ, कमी पाणी वापर सोबत विद्राव्य खते-पोषके देणे, पीक संरक्षण, पीक काढणी व साठवणूक अशा सर्वच व्यवस्थापनाची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना मिळते आहे. अशा उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याला नेमका लाभ काय मिळतो वा या पाहणीतून शेतकऱ्यांचा फायदा काय ? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
या प्रश्नाचे सविस्तर उत्तर श्री. बी. डी. जडे (वरिष्ठ कृषी विज्ञानशास्त्रज्ञ तथा कृषी विस्तार-प्रशिक्षणाचे प्रमुख) यांनी दिले आहे. ‘जैन’ मधील पाहणीतून शेतकऱ्यांना मिळणारे १० लाभ असे –
१) शेती फायदेशीर कशी करावी ? या विषयी सकारात्मक मानसिकता तयार होते.
२) भारतासह जगभरात शेतीचे प्रगत, अद्ययावत व आपल्या भागात पूरक तंत्रज्ञान कोणते याची पाहणी होते व माहिती मिळते.
३) पिकाला ठिबक वा तुषार पद्धतीने नेमके किती पाणी द्यावे ? याचे प्रात्यक्षिक पाहता येते. विनाकारण जादा पाणी देण्याचा समज दूर होतो.
४) पिकाची वाढ व पोषण संतुलित पद्धतीने करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करणे याची नेमकी माहिती मिळते.
५) पिकांच्या लागवडीसाठी टिश्यूकल्चर रोपांची माहिती मिळून त्यांची उपयुक्तता समजते.
६) फळ पिकांची लागवड आणि त्यातील आंतर पिकांचे व्यवस्थापन कळते.
७) ऊती संवर्धित रोपे, त्यांची गुणवत्ता समजते. फळे, भाजीपाला आणि वनपिके या विषयी माहिती मिळते.
८) कांदा, केळी, आंबा, पेरू, मोसंबी, चिकू, लिंबू यांची लागवड प्रगततंत्रज्ञानाने कशी होते हे समजते.
९) नियंत्रित शेती ही संकल्पना लक्षात येते. शेडनेट, पाॅली हाऊस, ग्रीन हाऊसमध्ये पिकांची लागवड कशी करावी ? अधिक उत्पादन कसे घ्यावे ? याविषयी विस्तृत माहिती मिळते.
१०) सर्वांत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे भविष्यातील शेती कशी असेल ? हे समजते. पाण्यातील शेती, विना मातीची शेती आणि समांतर शेती याची प्रात्यक्षिके पाहता येतात ..
Ⓒदिलीप तिवारी, जळगाव