मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे ४ आठवड्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालेल.
या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. तत्पूर्वी प्रथेप्रमाणे ‘वंदे मातरम्’ गीत होईल; मात्र पहिल्यांदाच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीतही होईल.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यांवर सहा दिवस चर्चा होईल. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त) ५ आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची मान्यता अपेक्षित) ८ अशी अंदाजे १३ विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत.
अधिवेशन ५ आठवड्यांचे हवे : अजित पवार
अर्थसंकल्पीय अधिवेशन पाच आठवड्यांचे व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बैठकीनंतर केली. आमदारांना आपापल्या भागातील प्रश्न मांडायचे आहेत, चर्चा करायची आहे. त्यामुळे सरकारने पळवाट काढू नये, आणि मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहून सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असेही पवार म्हणाले.
तुमच्या उपयोगाची बातमी, khabarbat.com