गेल्या काही वर्षात हजारो नोकऱ्या या यांत्रिकीकरण, ऑटोमेशन्सने अक्षरश: संपवल्यात. संगणक असो कि कॅलक्युलेटर प्रत्येक वेळी नवनवीन यंत्रांच्या वापरामुळे मानवी नोकऱ्यांवर गंडांतर आले. २२ डिसेंबर २०२२ पासून आता ‘Chat GPT’ च्या रूपाने नोकर कपातीच्या गंडांतर योगाचे सावट जगभर घोंघावत आहे. वस्तुतः चॅट जीपीटी हे एक तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक स्वरुप आहे. कोणतेही काम करण्यासाठी लागणारा मानवी वेळ कमी करीत तो चुटकीसरशी कामे उरकणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या नोकरीवर पुन्हा गदा येणार का? याचाच सर्वांनी धसका घेतला आहे.

Chat GPT हे एक साॅफ्टवेअर आहे. त्याचं पूर्ण नाव जनरेटिव्ह प्रेंऩ्टेंड ट्रान्सफाॅर्मर असं आहे. याला आपण आधुनिक एनएमएस अर्थात न्यूरल नेटवर्क बेस्ड मशीन लर्निंग माॅडेल असेही म्हणतात. हे साॅफ्टवेअर गुगलप्रमाणे रियल टाईम सर्च देत नाही, तर यूजर्सने विचारलेल्या प्रश्नांचे तात्काळ आणि जलदरित्या उत्तर देते. उल्लेखनीय म्हणजे सध्या हे लोकांच्या पसंतीस उतरले आहे.
Chat GPT चे CEO सॅम अल्टमॅनच्या मते, या साॅफ्टवेअरने एका आठवड्याच्या आत किमान १० लाख यूजर्सपर्यंत मजल मारली. world statistics या ट्विटर हॅडलनुसार, नेटफ्लिक्सला हा टप्पा गाठण्यासाठी ३.५ वर्षे लागली, तर ट्विटर आणि एफबीला १० महिने लागले. इन्स्टाग्रामला ३ महिने लागले होते.
Chat GPT २० अब्ज डॉलर्सवर
थेट दैनंदिन मानवी जीवनावर परिणाम करणारी एखादी नवीन बाब जेव्हा समोर येते, तेव्हा त्याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. Chat GPT विषयी देखील सध्या असेच घडते आहे. २०१५ मध्ये सॅम ऑल्टमन आणि इलॉन मस्क या दोघांनी त्याची सुरुवात केली. तेव्हा ती एक ना-नफा कंपनी होती. नंतर इलॉन मस्कने २०१८ मध्ये हा प्रकल्प सोडला आणि नंतर मायक्रोसॉफ्टने त्यात गुंतवणूक केली आणि आज या कंपनीचे मूल्यांकन चक्क २० अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे.
GOOGLE झाले बेजार
महत्वाचे म्हणजे कोणतेही ज्ञान हे आता व्यक्तिगत स्वामित्वाचा घटक असणार नाही, ते सर्वात्मक होईल. विशेषत: असे लोक ज्यांचे काम प्रश्नोत्तराशी संबंधित आहे. पत्रकार, वकील, कस्टमर केअर आणि शिक्षक असे सारे जे लोक आपापल्या बौद्धिक संपदेवर, किंबहुना ज्ञानाद्वारे आपली उपजीविका करतात आणि प्रश्नांची उत्तरे देऊनच ते आपला व्यवसाय चालवत असतात. अशा लोकांचा रोजगार Chat GPT हिरावून घेऊ शकते, अशी धास्ती अनेकांनी घेतली आहे.
गुगल सारख्या तगड्या संस्थेने देखील चिंता व्यक्त केली आहे. कारण ज्या सर्च इंजिनच्या माध्यमातून गुगलला सर्वाधिक कमाई होते, तेच आता Chat GPT मुळे कालबाह्य ठरू शकते, ते जर बंद पडले तर काय? याची भीती Google ला सतावत आहे. Gmail चे निर्माते पॉल बुशेट यांनीच गुगलचे सर्च इंजिन वर्ष-दोन वर्षात बंद पडेल असे म्हटले आहे. संदर्भ ……..
Google may be only a year or two away from total disruption. AI will eliminate the Search Engine Result Page, which is where they make most of their money.
Even if they catch up on AI, they can't fully deploy it without destroying the most valuable part of their business! https://t.co/jtq25LXdkj
— Paul Buchheit (@paultoo) December 1, 2022
सकारात्मक पर्यायाची गरज
Chat GPT हे एक तंत्रज्ञान आहे. यामुळे आपले जीवन सुखकर करता यायला हवे, तसे सकारात्मक पर्याय आपणच शोधायला हवेत. परंतु हि बाब सामान्य माणसाच्या पचनी पडणे तसे कठीण आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘ओपन एआय’ (Open AI) या कंपनीने ‘चॅट जीपीटी’ (Chat GPT) हे संभाषण करणारे ऍप तयार केले. याद्वारे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अवघ्या काही सेकंदात मिळते.
शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार
उदा. शेतकरी ‘चॅट जीपीटी’च्या मदतीने शेती विषयी हवी ती माहिती सहज मिळवू शकतात. समजा, तुमच्या पिकावर एखाद्या किडरोगांचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यावर कोणते कीटकनाशक फवारले पाहिजे, याचे उत्तर चॅट जीपीटी देऊ शकते. अशा पद्धतीने शेती क्षेत्रातही Chat GPT चा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना माहितीचे भांडार खुले झाले आहे.
तूर्त तरी Chat GPT अजून प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे त्याच्याकडे २०२१ च्या आधीची माहिती उपलब्ध आहे. त्याची प्राथमिक भाषा इंग्रजी आहे. किमान इंग्रजी भाषा समजत असेल तर गुगल ट्रान्सलेटरच्या माध्यमातून प्रश्नोत्तरे भाषान्तरित करून वापर करता येईल.
– श्रीपाद सबनीस (Editor, khabarbat.com)
Call : 9960542605