‘कमळ’ कोमेजणार, तर ‘घड्याळ’ चालणार ….
मुंबई : इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने ‘मूड ऑफ द नेशन’ची चाचपणी केली. यामध्ये एनडीए सरकारच्या कार्यशैलीबाबत देशातील लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व्हेत युपीए अर्थात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या ३४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. म्हणजेच भाजपला २७ जागांचा फटका बसण्याची तर ‘मविआ’ला २८ मतदार संघात फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अर्थात, सत्तारूढ भाजप आणि शिंदे गटाच्या जागा कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. या जनमत कल चाचपणीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले कि, या सर्व्हेने दिशा दाखवली असून ती दिशा सत्ताधाऱ्यांसाठी सोयीची नाही.
शरद पवार म्हणाले, सी व्होटर्सचा सर्व्हे मी पाहिला. त्यातील कल आणि महाराष्ट्रातील आकडेवारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. सर्व्हे करणाऱ्या संस्थेची सत्यता याआधीही स्पष्ट झालेली आहे. पण मी त्यावर विश्वास ठेवणार नाही. मात्र या सर्व्हेने दिशा दाखवली असून ती दिशा सत्ताधाऱ्यांसाठी सोयीची नाही, असेही शरद पवार म्हणाले.
कर्नाटकचा सर्व्हे वेगळा आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार राहणार नाही. पण उत्तर प्रदेश सर्वात मोठा भाग आहे. तेथील ठराविक माहिती आमच्याकडे नाही, असेही पवार म्हणाले.
भाजप आणि शिंदे गटाचे नेमके काय होणार याकडे सर्वांच लक्ष आहे. इंडिया टुडे (India Today) आणि सी वोटरच्या (C Voter) सर्व्हेवरून राजकीय घमासान सुरू झाले आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीचा मोठा फायदा तर, भाजप-शिंदे गटाची चिंता वाढविणारी आकडेवारी यातून समोर आली. या सर्व्हेच्या मते भाजप-शिंदे गट आणि RPI ला फक्त १४ जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीचे तब्बल ३४ खासदार निवडून येऊ शकतात.
BJP ला २७ जागांचा फटका
२०१९ मध्ये महायुतीचे ४१ खासदार निवडून आले होते. त्यापैकी शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. पण, आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. आगामी निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला फक्त १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ भाजपला २७ जागांवर फटका बसू शकतो.
‘मविआ’ला २८ जागांचा फायदा
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५, तर काँग्रेसचा केवळ १ खासदार महाराष्ट्रातून निवडून गेला. महाविकास आघाडीचे सहा खासदार जिंकले होते. पण, यावेळी महाविकास आघाडीला २८ जागांचा फायदा होईल, असा अंदाज आहे.
४० जागा जिंकणार – ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व्हेनुसार आता निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला किमान ३४ जागा मिळतील. महाविकास आघाडी घट्ट राहिली, तर कमीतकमी ४० जागा जिंकू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.