बारामती I राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी कायम ओळखले जातात. दुसरीकडे आपल्या भाषणांमधून विरोधकांवर टीका करताना अजित पवार हे नेहमीच आपल्या खास शैलीत काही खास किस्से सांगत असतात. अशाच एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी एक किस्सा सांगितला आणि उपस्थितांना हसू अनावर झाले.
बारामतीत सुरु असलेल्या मोफत मोतीबिंदू उपचार शिबिराच्या कार्यक्रमात अजित पवार (Ajitdada )बोलत होते. यावेळी नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारेख, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी त्यांच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला. अजित पवार यांच्यावर डॉ. तात्याराव लहाने (Dr Tatyarao Lahane) यांनी शस्त्रक्रिया केली होती.
“एकदा परदेशात गेल्यावर मला जाणवलं की माझ्या डोळ्याला काही झालं आहे. त्यानंतर पुन्हा मंत्रालयात असताना मला डोळ्याला त्रास होत असल्याचे जाणवलं. मी तिथून उठलो आणि गाडीत बसलो आणि डॉक्टर लहाने यांच्याकडे गेलो. डॉक्टरांनी बॅटरी डोळ्यात टाकली आणि त्यांनी काहीतरी तपासलं. ते म्हणाले तुमचा रॅटिनाचा प्रॉब्लेम आहे. त्याला लेझरने बांध घालावा लागेल. उसाला बांध घालतो तसा डोळ्यात बांध घालावा लागेल असे ते म्हणाले. डॉक्टर सांगतात ते ऐकावे लागतं. ते म्हणाले कधी ऑपरेशन करायचे? तेव्हा मी म्हणालो आत्ताच्या आता करा. घरी ऑपरेशन झाल्यावर सांगेन. तिथेच डॉक्टरांनी मला आडवा केला आणि डोळ्यात बांध घातला,” असे अजित पवार म्हणाले.