राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक; वेगवेगळ्या घटनांसाठी पक्षाची रणनीती ठरणार
राजकीय विरोधक आहे म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही…
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मूग गिळून बसलेलो नाही; अजित पवारांनी ठणकावले…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या घटना घडत असताना सत्ताधारी पक्ष वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली व रणनीती ठरवण्यात आली, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
आपल्या नागरिकांबाबत चुकीचे घडले असेल तर कारवाई केली पाहिजे परंतु सत्ताधारी पक्ष उगीचच विरोधकांना त्रास देण्याचा आणि गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कुणीही सहन करणार नाही.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले होते त्यातून त्रासून राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. वास्तविक चुका असतील तर मग माझ्या किंवा कुणाच्याही असोत त्याच्यावर कारवाई करावी परंतु मुद्दाम कुभांड रचून कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. कुणाला तरी पुढे करुन गुन्हा दाखल करायला लावणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. राजकीय विरोधक आहे म्हणून संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी सरकारला दिला.
असे व्हायला लागले तर यावरून महाराष्ट्रात उठाव होईल. महाराष्ट्र शांत किंवा गप्प बसणार नाही, असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
मी उपटसुंभ लोकांच्या आरोपाला उत्तर द्यायला मोकळा नाही. किंवा त्याला उत्तर द्यायला बांधील नाही. त्याचं डिपॉझिट जप्त करून पाठवले आहे. अशा शब्दात अजित पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाव न घेता पडळकर यांना टोला लगावला.