मुंबई : राज्यात थंडीचा कडाका सुरू आहे. सर्वांत हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या खान्देशातील तापमानात सर्वाधिक घसरण झाली आहे. काश्मीरमध्ये सुरू असलेली बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेल्या दोन्ही पश्चिमी चक्रवातामुळे तापमान घसरले आहे.
राज्यातील १९ शहरांतील किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून तीन-चार दिवस थंडीच्या प्रकोपापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. राज्यासह देशात थंडीचा प्रकोप सुरू आहे.
महाराष्ट्रातील सुमारे १३ जिल्ह्यांतील किमान तापमानात ५ ते ६ अंशांची घट झाली. राज्यात तापमानाचा नीचांक नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये नोंदवला गेला. ओझरचे तापमान ४.७ अंश सेल्सियस होते. त्यानंतर निफाडचा क्रमांक आहे.
राज्यातील सर्वांत उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या जळगाव, धुळ्याचे तापमान ५ अंशांवर आले आहे. औरंगाबाद ५.७ अंश, उस्मानाबादचे तापमान ९ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे. नाशिकमध्ये सकाळी नऊपर्यंत दाट धुक्याची चादर दिसून येत आहे.
तापमान आणखी घसरणार
मंगळवार व बुधवारीही किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. मुंबई तसेच कोकण वगळता संपूर्ण राज्यात १९ जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी पडणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.