नवी दिल्ली I विमानातील प्रवाशांना तासाला १ पेग मद्य सर्व्ह करण्याचा निर्णय एअर इंडिया या नागरी विमान वाहतूक कंपनीने घेतला आहे.
२६ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा यांनी मद्यप्राशन करून एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर ६ जानेवारी २०२३ रोजी देखील पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशाने जवळच बसलेल्या महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली होती. त्याच्या कृत्याबद्दल लेखी माफी मागितली होती आणि हे प्रकरण तिथेच मिटले.
मात्र आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर लघवी करणाऱ्या प्रवाशांच्या घटना वाढत आहेत. अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, फ्लाइटमध्ये अशी किती दारू पुरविली जाते, ज्यामुळे प्रवाशांचे शरीरावरील नियंत्रण सुटते?
एअर इंडियाने आपल्या वेबसाइटवर प्रवाशांना पुरवलेल्या अन्न आणि अल्पोपहाराच्या गाईडलाईन्स मध्ये असे म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय मार्गांवर चालणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मोफत मद्य किंवा वाईन दिली जाईल.
त्याच वेळी, दुसर्या ठिकाणी असे लिहिले आहे की, नाश्ता वगळता इतर सर्व प्रमुख जेवण सेवांमध्ये प्रवाशांना दारू सर्व्ह केली जाईल. याशिवाय, प्रवाशांसाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे लिहिले आहे की, CISF प्रमाणे, आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री शॉप्समधून खरेदी केलेल्या १०० मिली पेक्षा जास्त मद्य हँडबॅगमध्ये ठेवण्याची परवानगी नाही.
एअर इंडियाची मार्गदर्शक तत्त्वे
एअर इंडियाच्या वेबसाइटवरील एअर इंडिया अल्कोहोल सर्व्हिंग मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एअरलाइन म्हणते की, प्रवाशांनी ४ तास किंवा त्याहून कमी विमान प्रवासादरम्यान दोनदा दोन पेगपेक्षा जास्त अल्कोहोल पिऊ नये. त्याच वेळी, लांब पल्ल्याच्या आणि कालावधीच्या प्रवासादरम्यान, दर तासाला फक्त एक पेग दिले जाईल. मात्र, सतत अल्कोहोल सर्व्ह करताना फ्लाइट क्रूने त्यांच्या विवेकबुद्धीचा वापर करावा, असेही सुचवण्यात आले आहे.
मद्यप्राशनाला मर्यादा नाही
विमान प्रवासादरम्यान साधारणपणे वाईन, वोडका, व्हिस्की, रम, जिन आणि इतर प्रकारचे अल्कोहोल दिले जाते. तथापि, आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये नियमित प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, काही लोक अगोदर मद्यप्राशन करून फ्लाइटमध्ये प्रवास करतात आणि नंतर फ्लाइटच्या आतही दारू पितात.
याशिवाय दारूची कोणतीही निश्चित मर्यादा नसल्यामुळे आणि चालक दलातील सदस्यांना विवेकबुद्धी वापरण्याचे स्वातंत्र्य नसल्यामुळे प्रवाशांच्या आग्रहापुढे दारू द्यावी लागते. आणि मद्यपान करून शरीरावरील कंट्रोल सुटण्याच्या घटना घडतात.