khabarbat

site logo final

Join Us

Advertisement

Dhondge : केशवाय नम:

Keshavrao Dhondge

काळाला हरवून ‘मन्याड खोऱ्यातील ढाण्या वाघ’, शतक पूर्ण करून आपल्या कर्तृत्त्वाची पाऊले उमटवून गेला आहे… उद्धवराव पाटील गेले… दि. बा. गेले… दत्ता पाटील गेले… एन. डी. गेले, गणपतराव गेले… आता केशवरावही गेले… शे. का. पक्षाची धग आणि रग जणू काळाने हिरावून नेली आहे. असे नेते आता पुन्हा होणार नाहीत. 
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी भाई केशवराव धोंडगे यांना वाहिलेली आदरांजली येथे khabarbat.com च्या व्यासपीठावर उद्धृत करीत आहोत

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे

गणेश पूजन करताना सुरुवातीला २१ नावे उच्चारली जातात. त्यातील पहिले नाव… ‘केशवाय नम:’ असे घेतले जाते. महाराष्ट्र विधान मंडळाच्या राजकारणात सलग १५ वर्षे आणि १९८५ ते १९९५ नंतरची दहा वर्षे अशी एकूण २५ वर्षे विधानसभा सभागृहात या नामाचा गजर झालेला आहे, १९६२ ते १९७२ या काळात सलग १० वर्षे बाळासाहेब भारदे हे विधानसभेचे अध्यक्ष होते. ते पंढरपूर देवस्थान समितीचेही अध्यक्ष होते. वारकरी पंथाचे होते. सभागृहात त्यांचे आगमन झाल्यावर डाव्या बाजूच्या चौथ्या बाकावरून वारकरी थाटात एक आवाज घुमायचा…
‘पुंडलीका वरदे हरि विठ्ठल….  श्री ज्ञानदेव तुकाराम…  पंढरीनाथ महाराज की जय….’
आणि या आवाजाला सगळे सभागृह दणकेबाज आवाजातच पाठींबा द्यायचे. हा आवाज होता केशवराव धोंडगे यांचा. ते कडव्या डाव्या विचारांचे होते. पण, तेवढेच वारकरी पंथाचेही कडवेच होते. किंबहुना हे व्यक्तिमत्व ना कुंचल्यानी रेखाटता येणारे… ना शब्दांनी उभे करता येणारे… संसदीय इतिहासात ज्याला ‘आगळे-वेगळे’ म्हणता येईल, असे केशवराव होते. १०२ वर्षे जगले. आजपर्यंतच्या आमदारांचा तपशील पाहिला तर इतके वर्षे जगणारा आमदार हा विक्रमही केशवरावांच्या नावावरच आहे. आमदार आणि माजी मंत्री बी. जे. खताळ हे १०० व्या वर्षी गेले. केशवरावांचे अनेक विक्रम आहेत… विधान मंडळात ते १९५७ साली आले. १९५७ ते १९७७ … १९८५ ते १९९५ अशा २५ वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत एकही दिवस विधानमंडळाच्या कामकाजात गैरहजर न राहिलेला हा एकमेव आमदार… हा ही त्यांचाच विक्रम. शेवटच्या दिवसांत प्रकृती बिघडल्यामुळे औरंगाबादच्या कमलबाबूंच्या एम. जी. एम. रुग्णालयात त्यांना दाखल करावे लागले. त्यापूर्वी २५ वर्षे आमदार… अडीच वर्षे खासदार या काळात एकदाही आजारी न पडलेला हा एकमेव आमदार असावा. विधान मंडळाचे अधिवेशन मुंबईला असो किंवा नागपूरला असो…. ते सुरू झाल्यानंतर कोणत्याच्या शनिवारी-रविवारी म्हणजे सुटीच्या दिवशी गावाला न जाणारा… अधिवेशनाचा शेवटचा दिवस पार पडेपर्यंत मुंबई किंवा नागपूर न सोडणारा हा एकमेव आमदार होता. सभागृहात सर्वाधिक लक्षवेधी उपस्थित करणारा विरोधी बाकावरील हा एकमेव आमदार… शे. का. पक्षाचा आमदार असूनही शे. का. पक्षासाठी दिलेल्या आसन क्रमांकावर न बसता अध्यक्षांच्या डाव्या हाताच्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये चौथ्या बाकावर कायम बसणारा हा एकमेव आमदार… त्यांनी कधी पक्ष बदलला नाही… जागा बदलली नाही… लांब सोग्याचे धोतर कधी बदलले नाही. पिंगट रंगाचा झब्बा कधी बदलला नाही आणि समोर दिसेल त्याला ‘खश’ अत्तर लावल्याशिवाय या माणसाने कोणालाही पुढे जाऊ दिले नाही. सभागृहात न्याय मिळवण्यासाठी आटा-पिटा करणारा… सभागृहाच्या बाहेर सुगंध वाटत असायचा…
१९८७ सालची गोष्ट. राज्यपालांचे विधानमंडळातील आगमन… हा एक मोठा सोपास्कार असतो… राज्यपाल भाषणाला येण्यापूर्वी सगळे आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या जागेवर बसावे लागते. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती राज्यपालांच्या उजव्या- डाव्या हाताला चालत त्यांना सन्मानाने विधान मंडळात घेवून येतात. १९८७ साली विधानमंडळाच्या पायंड्यांवरून राज्यपाल शंकर दयाळ शर्मा आतमध्ये येताना बाजूला उभ्या असलेल्या केशवरावांनी त्यांना थांबवले… अत्तराचा फाया काढून त्यांच्या हाताला अत्तर लावले. स्वत:हूनच नाव सांगितले. वडिलधारे असलेल्या शर्माजींनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांना हात मिळवला. नंतर त्यांना कळले की, हे आमदार आहेत… त्यावेळी मीडियावाले नव्हते. नाहीतर दिवसभर तो व्हीडीओ झळकत राहिला असता.
विधान सभेतील, दि. बा. पाटील, दत्ता पाटील…. गणपतराव देशमुख, विधान परिषदेत एन. डी. पाटील… यांच्या तोडीस तोड केशवराव होते. २५ वर्षे शे. का. पक्षाचेच आमदार होते. पण, केशवरावांना ना कधी विरोधी पक्षनेता होता आले… ना त्यांना कधी प्रतोद केले गेले. त्याबद्दल त्यांना कधीही खंत नव्हती. पहिल्या दहा वर्षांच्या आमदार पदाच्या काळात नांदेडहून मनमाडपर्यंत मीटरगेजने प्रवास करून नंतर कलकत्ता मेलने ते मुंबईत यायचे. अनेकवेळा थेट एस. टी. ने मुंबईत यायचे. त्यांना कधी मोठ्या गाड्या वापरून मिरवण्याची हौस नव्हती. आमदार निवासातच राहायचे. आमदार निवासात ज्या दर्जाचे जेवण असेल, तेच जेवायचे. त्यांनी व्यक्तीगत कोणतीही तक्रार विधानसभेत कधीही केली नाही.
शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी एकदा जाहीरपणे सांगून टाकले की, ‘नांदेड जिल्ह्यावर एकच काळा डाग आहे… तो म्हणजे कंधार मतदारसंघ काँग्रेसला जिंकता येत नाही… तो डाग मी पुसून टाकीन.’ त्यांचे बोट केशवरावांकडे होते… १९७७ साली केशवराव खासदार झाले. नांदेडमधूनच लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. १९७८ ला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी शे. का. पक्षाचे उमेदवार म्हणून गुरुनाथ करुडे यांना केशवरावांनी निवडून आणले. १९७९ ला महाराष्ट्रातील पुलोद सरकार इंदिरा गांधी यांनी बरखास्त केल्यानंतर मे १९८० मध्ये विधानसभेची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शंकरराव चव्हाण यांनी ‘काळा डाग पुसून काढण्यासाठी’ सर्व ताकद पणाला लावून कंधार मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून ईश्वरराव भोशीकर यांना उमेदवारी दिली आणि पहिल्यांदा कंधार मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदार विजयी झाला. पण त्यावेळी केशवराव निवडणूक़ लढवत नव्हते. १९८५ ला विधानसभेची निवडणूक लागली तेव्हा केशवराव विधानसभेला उभे राहणार नव्हते. ‘मी खासदार म्हणून नांदेडमधून निवडून आलो आहे, आता विधानसभेला उभे राहणे योग्य नाही’ असे त्यांचे मत होते. त्यांनी जाहिरपणे ते व्यक्त केले होते. मात्र १९८० च्या विधानसभा निवडणुकीतील कंधारच्या शे. का. पक्षाच्या उमेदवाराचा पराभव त्यांना अस्वस्थ करत होता म्हणून जाहीरपणे त्यांनी ‘आता माझा पराभव करून दाखवा’ असे सांगून ते उभे राहिले. मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. पुन्हा १९९० ला उभे राहिले…. विजयी झाले.
पाच विधानसभा निवडणुका आणि एक लोकसभा निवडणूक यामध्ये पराभूत न झालेले केशवराव होते. शिवाय महाराष्ट्रात जे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे उमेदवार असतील… ज्यांची निवडणूक कायम लोकांनी लढवली…  कमित-कमी खर्चात पाच वेळा आमदार झालेल्या नेत्याचे नावही केशवराव धोंडगे हेच असेल.
सभागृहाची बैठक सुरू झाल्यानंतर बैठक संपेपर्यंत सभागृहात कायम उपस्थित असलेल्या आमदारांमध्येसुद्धा केशवरावांचेच नाव घ्यावे लागेल.
सीमाप्रश्न हा त्यांचा भावनात्मक प्रश्न होता. विधानसभेत उद्धवराव पाटील, गणपतराव देशमुख आणि केशवराव धोंडगे या प्रश्नावर जीवाचे रान करून लढले. परिषदेचे एन. डी. लढले. कडाक्याच्या थंडीत १९५८ साली लोकसभेवर गेलेल्या बेळगाव- कारवार सीमा मोर्चात केशवराव आघाडीवर होते. त्यांच्यासोबत त्यांच्या वृद्ध मातोश्री होत्या…. त्यांच्या धर्मपत्नी होत्या. साराबंदी आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यावेळच्या म्हैसूर सरकारने दहा-दहा महिन्यांच्या शिक्षा ठोठावल्या. त्यात केशवरावही बी. डी. जत्ती सरकारच्या तुरुंगात सक्त मजुरीची शिक्षा भोगलेले आहेत. आणखी एक विशेष असा की, २५ वर्षांच्या आमदारकीच्या काळात सगळ्यात जास्त मोर्चे काढणारा आणि मन्याड धरणासाठी विधानसभेत सर्वस्व पणाला लावून लढणारा हा एकमेव आमदार आहे. त्यामुळेच आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘मन्याड खोऱ्यातील ढाण्या वाघ’ ही पदवी दिली होती. मन्याड धरण हे केशवरावांचे स्मारक.
विधानसभा सभागृहातील केशवरावांच्या उपस्थितीची अध्यक्षांना सतत दखल घ्यायला लावत होती.
शे. का. पक्षांच्या आमदारांपैकी सर्वात अभ्यासू आिण मुद्द्याचे बोलणारे उद्धवराव पाटील होते. आक्रमक बोलणारे दि. बा. पाटील, दत्ता पाटील होते…. विधान परिषदेत एन. डी. पाटील होते…. केशवराव यांच्या संसदीय कारकीर्दीचे मिश्रण दोन्ही प्रकारचे होते. ते आक्रमकही होते, विनोद करून सरकारला चिमटे काढणारे तेच होते… अभ्यासपूर्ण भाषणही करत होते. अर्थसंकल्पावर अध्यास करून बोलत होते. तरीसुद्धा सभागृहातील त्यांची प्रतिमा उद्धवराव किंवा दि. बा., गणपतराव किंवा एन. डी. सारखी तयार झाली नाही. पण, ते जे काही बोलत तो त्यांचा प्रत्येक शब्द मनाच्या तळापासून येतोय, याची सभागृहाला खात्री वाटायची. कृत्रिमपणा कुठेही नव्हता. त्यांच्या प्रत्येक वाक्याचा परिणाम जाणवत होता. त्यामुळे ‘सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी पोटतिडकीने बोलणारा आमदार’ ही त्यांची प्रतिमा मात्र कायम राहीली. शिवाय त्यांच्याजवळ असे काही शस्त्र होते ते शस्त्र गांधीजींच्याच शिकवणीचे होते.
१९८६ सालची गोष्ट… तो नेमका प्रश्न आता विसरलो…. पण, एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांनी सभागृह दणाणून सोडले. सरकारी बाकावरून मंत्र्यांनी उडवाउडणवीचे उत्तर दिले. या उत्तराने समाधान न झाल्याने केशवरावांनी सभागृहात मौन धारण केले. ८ दिवस झाले केशवराव सभागृहात तोंड उघडत नव्हते. सभागृहाच्या अध्यक्षांनाच अस्वस्थ वाटले. सगळ्या सभागृहाने ठराव करून… ‘केशवराव, तुम्ही मौन सोडा…’ अशी विनंती केली. सभागृहात त्यांना बेदखल करताच येत नव्हते. आपल्या मौनाने सभागृहाला अस्वस्थ करणारा हा एकमेव आमदार.
त्यांच्यावर लिहायचे तर खूप लिहिता येईल. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर महाभारत घडलेले आहे. असे अनेक विषय आहेत… पण, त्यांच्यातील विनोदी माणूस सभागृहात सतत जागा असायचा… वसंतदादा मुख्यमंत्री असताना भाजपाचे अभ्यासू आमदार हशू अडवाणी यांनी एक टोकदार प्रश्न विचारला…. केंद्र सरकारकडून राज्याला येणारी मोठी रक्कम त्यावेळच्या सरकारने स्वीकारली नव्हती. हशू अडवाणींनी विचारले की, ‘मुख्यमंत्रीजी, केंद्र सरकार इतनी बडी राशी देने के बावजुद… राज्य सरकार ये राशी क्यूँ नहीं उठा रहीं हैं?’ उत्तर द्यायला वसंतदादा उठले… ‘अध्यक्ष महाराज, ऐसा है… अंथरूण देख के पाय पसरना मंगता हैं…’ सभागृहात प्रचंड हशा पिकला.. केशवराव उभे राहिले…. त्यांनी उपप्रश्न विचारला…. ‘अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्र्यांचे हे उत्तर कोणत्या भाषेत आहे….? ’ फार न शिकलेले, पण राजकीय शहाणपणात जागरूक असणारे वसंतदादा सहज सांगून गेले…. ‘केशवराव, तुमच्याकरिता मराठीत आणि हशूजींकरिता हिंदीत….’ आणि मग हशूजींकडे बघून दादांनी विचारले, ‘हशूजी, आपको समझा ना?’ त्यांनी जागेवर बसूनच सांगितले, ‘हा हा समझा… ’ केशवराव उभे राहून म्हणाले, ‘अत्यंत प्रभावी मराठी आणि तेवढेच ‘प्रभावी हिंदी’ बोलणारा मुख्यमंत्री आम्हाला लाभला… त्यांना मानाची कोटी कोटी जयक्रांती….’त्यावेळची सभागृहातील चर्चा अशी असायची. सन्मान ठेवून काम चालायचे.
आठवणी खूप आहेत… १९६१ ते १९९० सलग ३० वर्षे विधानसभा संकलन केले. सगळे प्रसंग डोळ्यांसमोर आहेत… १९९० साली संपादक झाल्यावर मोठे पद मिळाले पण… आयुष्यातली संसदीय चर्चेची मेजवानी संपली असे वाटले… विधानसभेतील चर्चेने मी खूप काही शिकलो. त्यावेळच्या चर्चा शिकण्यासारख्या होत्या.
त्यावेळी अभ्यासू आमदार होते… समृद्ध वाचनालयात आमदारांची गर्दी असायची. अत्यंत दर्जेदार इंग्रजी आणि उर्दु बोलणारे त्यावेळचे आमदार जी. एम. बनातवाला यांचे उर्दु भाषण ऐकताना संगीत ऐकल्यासारखे वाटायचे. त्या भाषेची नजाकत फार जबरदस्त आहे… एकदा बनातवाला यांचे मराठवाड्यातील एका विषयावर उर्दूत दर्जेदार भाषण झाले. त्यानंतर केशवराव उठले… बनातवाला यांना झाकोळून टाकेल इतक्या नजाकत असलेल्या उर्दूत केशवरावांचे ते भाषण सभागृहाला थक्क करून गेले होते.
केशवरावांनी मराठवाड्यात विधानसभेचे एक अधिवेशन होण्यासाठी िकमान २५ वेळा तरी अशासकीय ठराव मांडले असतील. नागपूरला अिधवेशन घेता… मग मराठवाड्यावर अन्याय का? एक अिधवेशन मुंबईत… एक नागपूरला आणि एक औरंगाबादला घ्या. हा त्यांचा सतत आग्रह होता. तो मान्य झाला नाही. पण, त्याचा पर्याय म्हणून मंत्रिमंडळाची एक बैठक औरंगाबदला घ्यायची सुरुवात झाली. ती केशवराव यांच्यामुळेच. औरंगाबादला कॅबिनेटची बैठक दिली म्हणून मग कोकणच्या आमदारांनी कोकणात बैठक घेण्यासाठी अंतुलेसाहेब मुख्यमंत्री असताना आग्रह धरला… आणि १९८० पासून कॅबीनेटची एक बैठक रत्नागिरीला होऊ लागली. अर्थात ती बैठक देवगडचे हापूस आंब्याचे आगमन व्हायच्या वेळेस होईल, हे वेळापत्रक काळजीपूर्वक पाळले गेले.
विधान सभेतील विरोधी बाकावरचे त्यावेळचे जबरदस्त असलेले सगळेच आमदार आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत… तसे मंत्रिमंडळही आता नाही… तसे निर्णयही नाहीत… महाराष्ट्राची बांधणी करायचा विषयही नाही… तसे विरोधी आमदारही नाहीत… ते सभागृह… ती भाषणे… ते आमदार सारेच काही काळाच्या पडद्याआड गेले आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like