देगलूर : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीच्या तपासणीसाठी दाखल करण्यात आलेल्या मनिषा शिंदे हिच्या मृत्युस जबाबदार असलेल्या व कर्तव्यात कसूर केलेल्या डाॅ. प्रदीप ठक्करवाड याला तात्काळ निलंबित करा व सदोष मनुष्य वधाचा खटला दाखल करून मनिषाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी देगलूर येथील उप विभागिय कार्यालयावर सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला.

मौजे तळणी ता. बिलोली येथील रहिवासी असलेल्या मनिषा शिंदे हिला देगलूर येथील उप जिल्हा रुग्णालयात दिनांक १६ डिसेंबर रोजी रात्री प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते तेव्हा कर्तव्यावर असलेले डॉक्टर प्रदीप मारोती ठक्करवाड यांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडून सीझरीन साठी १२ हजार रूपयची मागणी करून पैसे घेतल्यानंतर शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याने मनिषाचा दिनांक २० डिसेंबर रोजी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.सदरील मृत्यूला कारणीभूत असलेले बेजबाबदार डॉ प्रदीप ठक्करवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिवशंकर वलांडे आणि इतर कर्मचारी यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांना तात्काळ निलंबित करून सदोष मनुष्य वधाचा खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, AIMIM चे सय्यद मोईन,सुशीलकुमार देगलूरकर,सय्यद मोहियोद्दीन, भाजप शहराध्यक्ष अशोक गंदपवार, विकास नरबागे, AIMIM चे शहराध्यक्ष महम्मद जाकेर यांच्यासह इतर सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक व महिलाची मोठ्या संख्येने मोर्चात सामील झाले होते.