नांदेड । नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे माळेगांव येथील यात्रेला देवस्वारी, पालखी पूजनाने आज सुरुवात झाली. यावर्षी यात्रेला भाविक भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. मात्र यंदाच्या यात्रा नियोजनात माळेगाव ते जेजुरी… असा यात्रेचा प्रवास होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पॉम्प्लेटवरून दिसून येत आहे.
यात्रेच्या नियोजनात अनेक बाबीकडे म्हणजे २०१८, २०१९ ची पत्रिका… आणि सर्वच जुन्या परंपरा मोडीत काढण्यात आले असल्याचे आढळून आले आहे. माजी अध्यक्ष श्यामराव कदम, गंगाधरराव कुंटूरकर स्वतः मुख्यमंत्र्यांना आग्रहाने निमंत्रण देत असत…. या वर्षी प्रशासक असल्याने की काय..? सर्व परंपरा खंडित… करण्यात आली की काय असे दिसते आहे. तथापि, लावणी कलावंतांना पायघड्या घालून निमंत्रण अन् खुद्द जिल्ह्याच्या पालकमंत्र्याना मोबाईलवरून निमंत्रण देण्याची प्रथा जि.प.च्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचे पाहण्यास मिळाले आहे.
जि.प.च्यावतीने २२ डिसेंबर ते २६ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या यात्रेतील विविध कार्यक्रमाची माहिती असलेले एक पॉम्प्लेट पत्रकारांना दिले. त्या पाँपलेटवर छापण्यात आलेले देऊळ हे माळेगांवच्या खंडोबारायाचे नसून जेजुरीच्या खंडोबाचे असल्याचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी माळोदे यांच्या निदर्शनास पत्रकारांनी आणून दिले. यावेळी ते म्हणाले, मग काय झाले, खंडोबाचेच देऊळ आहे की… असे बेजबाबदार उत्तर त्यांच्याकडून मिळाले. या प्रकारावरून जिल्हा प्रशासनाकडून यात्रेबाबत कशी उदासीनता आहे हे दिसून आले आहे. एव्हढेच नाहीतर माळेगांव यात्रेचे निमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्रिका घेवून जि. प. चे एक शिष्टमंडळ मंत्र्यांच्या भेटीसाठी जाते आतापर्यंतची ही परंपरा आहे. मात्र जिल्हा परिषदेत प्रशासक राज आल्यानंतर माळेगांव यात्रेचे निमंत्रण पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांना फोनव्दारे संपर्क साधून देण्यात आले असल्याची माहिती जि.प. चे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी दिली.
तसेच माळेगांव यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांचा मेळा असे छापण्यात आले आहे. माळेगांव यात्रेला आज दि. २२ डिसेंबर पासून देवस्वारी व पालखी पूजनाने प्रारंभ झाला आहे. ही यात्रा २६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दरम्यान दि.२२ डिसेंबरला महिला व बालकांसाठी स्पर्धा, भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे कोण..? आहेत याचा उलगडा निमंत्रण पत्रिका न छापल्यामुळे होत नसल्याचे संदीप माळोदे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले, आज रात्रीतून पत्रिका छापून येतील. मान्यवरांना डिजीटल निमंत्रण पत्रिका मोबाईलवर पाठविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदरीत माळेगांव यात्रा नियोजनात अनेक त्रुटी ठेऊन यात्रेची जुनी परंपरा मोडीत काढून माळेगाव यात्रेचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जाते आहे.