khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

लातूरच्या ‘देशमुख गढी’ला ‘भाऊबंदकी’चे धुमारे..!!

– श्रीपाद सबनीस, मुख्य संपादक, khabarbat.com 

एकूणच महाराष्ट्रात राजकीय सत्तांतर नाट्य घडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले, त्याचा अपेक्षित परिणाम लातूर जिल्ह्यातील राजकारणावर देखील दिसू लागला आहे. लातूर जिल्हा काँग्रेसचे प्रमुख अमित देशमुख यांचा आणि लातूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचा म्हणावा असा संबंध दिसत नाही. त्यामुळेच जिल्हा परिषदेवर हक्काचा कारभारी बसवण्याच्या हालचाली अमित देशमुख यांनी सुरू केल्या आहेत. त्यांच्या पत्नी अदिती देशमुख यांचा ग्रामीण भागातील जनतेशी, शेतीशी संपर्क घडवून आणला जात आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेला सुटल्याने देशमुख कुटुंबीयांची पाऊले या दृष्टीने पडत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. देशमुख कुटुंबीयांनी स्त्री शक्तीचे सक्षम सबलीकरण आधीच केलेय. गौरवी दिलीपराव देशमुख या ‘जागृती’ कारखान्याच्या तर वैशाली देशमुख या ‘विलास’ कारखान्याच्या अध्यक्षा असणे हा त्याचाच परिपाक होय. भलेही ‘जागृती’चा कारभार दिलीपराव देशमुख व ‘विलास’चा कारभार अमित देशमुख पाहत आहेत. आता याच धर्तीवर जिल्हा परिषदेवर देखील अदिती देशमुख यांची वर्णी लावण्याचा विचार अमित देशमुख करीत असतील तर आश्चर्य कसले?

सध्याच्या घडीला लातूर जिल्हा बँक धीरज देशमुख यांच्या ताब्यात आहे, तेच लातूर ग्रामीणचे आमदार देखील आहेत. त्यामुळे ग्रामीण राजकारणात धीरज देशमुख यांचा वावर साहजिकच अधिक आहे, त्यांचे प्रस्थ ही मोठे आहे. त्या तुलनेत अमित देशमुखांची ग्रामीण राजकारणावरील पकड सैल आहे. नेमकी ही सल भरून काढण्यासाठी आणि जिल्ह्याचे नेतृत्व स्वतःकडे शाबूत राखण्यासाठी, किंबहुना जिल्ह्यावर अजूनही आपलाच अधिकार आहे, हे जनतेच्या मनात ठसवण्यासाठी जिल्हा परिषदेवर हक्काची किंबहुना त्यांच्या शब्दाच्या पलिकडे न जाणारी व्यक्ती असणे अत्यंत गरजेचे आहे. कदाचित याच भूमिकेतून अदिती देशमुख यांना प्रमोट केले जात असेल, तर त्यामुळे कोणाच्या भुवया उंचावण्याचे काही कारण नसावे. अदिती देशमुख या ग्रामिण भागाच्या सतत संपर्कात आहेत. शेती, सेंद्रिय शेती, सेंद्रिय भाजीपाला, साखर कारखाना आदी वेगवेगळ्या संकल्पना त्या राबवत आहेत. म्हणूनच की काय, आता देशमुखांनी फक्त भाजीचाच धंदा करायचा शिल्लक राहिला होता, अशा प्रतिक्रिया अनेकांकडून ऐकायला मिळत आहेत.

२०१९ ला लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख निवडून आले. मात्र त्यासाठी अमित देशमुख फारसे आग्रही नव्हते. तथापि, वैशाली देशमुख, दिलीपराव देशमुख यांच्यामुळे व रितेश देशमुख यांच्या संबंधामुळे धीरज देशमुख यांना अखेर उमेदवारी मिळाली व ते कसे निवडून आले हे सर्वज्ञात आहे. मात्र त्यामुळे रेणापूर, मुरुड, औसा या ग्रामीण भागातील राजकारणावर सध्या धीरज देशमुख यांचे प्रभुत्व वाढले. आता हे कमी की काय म्हणून जिल्हा बँकेचे सर्वेसर्वा दिलीपराव देशमुख यांनी गेल्या वर्षी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद हे धीरज देशमुखांकडे सोपवले. त्यामुळे लातूर ग्रामीणच नव्हे, तर संपूर्ण लातूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारण आपोआप धीरज देशमुख यांच्या संपर्कात किंबहुना अधिपत्याखाली आले, त्यांच्या प्रभाव क्षेत्रात वाढ झाली हे तितकेच खरे. जिल्ह्याचे नेतृत्व करत असलेल्या अमित देशमुखांकडे आज घडीला लातूर शहराच्या राजकारणा व्यतिरिक्त काही नाही किंवा ते असण्याचे काही कारण नाही.

अमित देशमुख पालकमंत्री असताना धीरज देशमुख यांनी सबंध लातूर जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा घेतल्या, ज्यात कोठेही अमित देशमुख यांचा फोटो वापरला नव्हता. फक्त विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख व धीरज देशमुख यांचेच फोटो व मोठ-मोठे बॅनर, होर्डिंग्ज लावलेले होते. एवढेच काय तर लातुरात या स्पर्धेचा बक्षीस सोहळा झाला त्यात देखील लातूर शहराच्या राजकारणाशी संपर्क असलेल्या मंडळींना बाजूला सारून ग्रामीण राजकारणाशी ज्यांचा संबंध आहे त्यांनाच निमंत्रित केले होते, याकडे कोणाचेही लक्ष गेले नसले तरी ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नक्कीच नाही. एकंदरीत धीरज देशमुख हे स्वतंत्र पर्याय तयार करत आहेत हे सुज्ञ नागरिकांना वेगळे सांगायला नको. अमित देशमुखांची छत्रछाया जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपल्याला ठोस काहीच मिळणार नाही, याची पुरेशी जाणीव प्रचंड राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या धीरज देशमुख यांना नक्कीच आहे.

एकंदरीत, लातुरातील राजकीय वर्तुळात ज्या घडामोडी घडत आहेत, त्या पाहता लातूर येथील देशमुख यांच्या गढीला जसे ‘भाऊबंदकी’चे धुमारे फुटत असल्याचे संकेत मिळतात; तसेच धीरज देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला आपसूकच बळ मिळते. वस्तुत: लातूर तालुक्यातील ११ जिल्हा परिषद गटांपैकी कोठूनही देशमुख परिवारातील सदस्य निवडून येऊ शकतो आणि हा इतिहास आहे. अदिती देशमुख यांना त्यासाठीच तर पद्धतशीर, नियोजनबद्धरित्या जनतेसमोर समोर आणले जात नसावे का? असा प्रश्न साहजिकच कोणालाही पडावा.

राजकीय समृद्धीचा महामार्ग अधिक प्रशस्त आणि सोयीस्कर बनवायचा असेल तर ग्रामीण राजकारणावर पकड असणे ही बाब अत्यावश्यक ठरते. त्यासाठी जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद, बाजार समिती, सोसायटी यासारख्या संस्था ताब्यात असणे अथवा या संस्थावर हक्काचा माणूस असणे ही पहिली अट असते. त्यासाठी प्रत्येक राजकारणी कटाक्षाने खबरदारी घेत असतो. या अनुषंगाने सध्या मराठवाड्याचे लक्ष विशेषत: लातुरातील देशमुखांच्या गढीकडे लागले आहे. एकूणच

या पार्श्वभूमीवर ‘ट्वेंटी वन शुगर’मधील आदिती देशमुख यांचा हस्तक्षेप व वावर देखील दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. या पदाचा संबंध देखील ग्रामीण राजकारणाशी येतो हे देखील विसरून चालणार नाही. शिवाय विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर वैशाली देशमुख या खासदार झाल्या असत्या किंवा त्यांनी दावा केला असता, जर लातूर लोकसभा मतदारसंघ आरक्षित नसता तर…?? असे आज देखील राजकीय विश्लेषक बोलतात.

तूर्त तरी अमित देशमुख नक्कीच या डावपेचात यशस्वी झाले आहेत हे काही वेगळे सांगायला नको. संभाजी पाटील, रमेश कराड वगळता प्रत्येक तालुक्यातील नेता अमित देशमुख यांना अनुकूल आहे. संभाजी पाटील निलंगेकर काहीही दावा करत असले तरी २०१७ च्या तुलनेत अमित देशमुखांना जिल्हा परिषद काबीज करणे फारसे अवघड नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अर्थात, काँग्रेसची स्थिती खूप चांगली आहे म्हणून नव्हे, तर भाजपला काँग्रेस जिवंत ठेवायची आहे, आणि यातच भाजपमधील नेत्यांचे हित दडलेले आहे. एकुणातच लातूरमध्ये प्रभावहीन विरोधी पक्ष असणे, अध्यक्ष पदाचे आरक्षण महिलेसाठी सुटणे या बाबी ग्रामीण राजकारणावर मांड ठोकण्यासाठी अमित देशमुख यांच्या दृष्टीने सुवर्णसंधी घेवून आल्या आहेत, हे निश्चित!

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »