२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईत अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करुन १७४ निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या केली. अजमल कसाब या पाकिस्तान समर्थित अतिरेक्याने आपल्या काही साथीदारांसह अंधाधुंद गोळीबार करुन रक्ताचा सडा पाडला. ही घटना प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरली गेलेली आहे. पण या घटनेची जखम आपल्या काळजातून व्यक्त करुन त्याची स्मृती ताजी ठेवून आपल्या मनात देशभक्तीची जाणीव तेवती ठेवण्याचे काम पत्रकार विजय जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमाने अगदी उत्कटतेने आणि प्रखरतेने केला आहे, यात तीळमात्र शंका नाही.
‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रातल्या पुणे, नागपूरसह तेलंगणातील आदिलाबाद येथेही झाले आहेत. या कार्यक्रमात नवोदित आणि प्रथितयश असे दोन्ही कलाकार आपल्या खड्या आवाजात जेंव्हा देशभक्तीपर गीते सादर करतात तेंव्हा सभागृहातील व सभागृह बाहेर स्क्रीनवर हा कार्यक्रम पाहणारा प्रत्येक प्रेक्षक देशभक्तीने रोमांचित होतो. टाळ्यांचा कडकडाट करीत उत्स्फूर्त दाद देतो.
आतापर्यंत ५४ कार्यक्रम झालेल्या या उपक्रमाच्या जन्माची कथा अगदी रोमांचक आणि स्फूर्तीदायक आहे. या उपक्रमाचे जन्मदाते, उदगाते आणि सादरकर्ते विजय जोशी यांनी सन २००८ मध्ये मुंबईवर झालेला अतिरेक्यांचा भ्याड हल्ला टिव्हीवर पाहिला. तुकाराम ओंबळेच्या अतुलनीय शौर्याने अभिमान दाटून आला. या प्रसंगाचे स्मरण देशवासियांना सतत रहावे आणि देशभक्तीची ज्योत त्यांच्या र्हदयात सतत तेवती रहावी यासाठी काहीतरी केले पाहिजे. असे विजय जोशींना प्रकर्षाने वाटले. त्यांनी ठरविले की, एका संगीताच्या कार्यकमातून या शहीदांना आणि मृत्यूमुखी पडलेल्या १७४ भारतीय आणि २० परदेशी नागरिकांना श्रध्दांजली वाहायची.. या कार्यक्रमास शीर्षक देण्याचा विचार येताच विजय जोशी यांच्या डोळ्यासमोर १९७२ च्या भारत-पाक युध्दाचा प्रसंग तरळला. त्यावेळी आकाशवाणीवर लता मंगेशकर यांनी गायिलेले एक गीत प्रसारित होत असे. गीताच्या ओळी होत्या..
भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठीसैनिक हो तुमच्यासाठी… आणि त्याक्षणी कार्यक्रमाचे शीर्षक ठरले. सैनिक हो तुमच्यासाठी.
या घटनेस ४८ तास उलटतात न उलटतात तोच विजय जोशींनी गजानन पिंपरखेडे, बापू दासरी, गोविंद पुराणिक या आपल्या सहकार्यांच्या साह्याने ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ चा पहिला कार्यक्रम केला. कार्यक्रमास देशभक्त रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. पहिल्या कार्यक्रमातच रसिकांचा असा भरभरुन प्रतिसाद पाहून विजय जोशी आणि त्यांच्या सहकार्यांनी कार्यक्रमाला मोठे स्वरुप दिले. विजय जोशी यांची कन्या सौ.वर्धिनी जोशी-हयातनगरकर यांनी आपल्या संगीताचा आणि गानकलेचा सुयोग्य संयोजन करीत ‘सैनिक हो…’ चे आखीव, रेखीव नियोजन केले.
व्यवस्थापन आणि रंगमंच व्यवस्थेसाठी विपुल जोशी यांनीही हिरीरिने सहभाग नोंदवत या कार्यक्रमाला एका उंचीवर नेले. वर्धिनी आणि विपुल मुळेच ‘सैनिक हो तुमच्यासाठी…’ या उपक्रमास देशभक्त रसिकांचा प्रतिसाद वर्धिष्णू राहिला आहे. सोबतच्या सहकार्यांनी केलेले परिश्रम, दिलेला प्रतिसाद यामुळे हा कार्यक्रम उंचीवर जाऊ शकला, असे विजय जोशी अभिमानाने सांगतात. या कार्यक्रमात आतापर्यत १४०० गायक-वादक कलावंतांनी कलाविष्कार केला आहे. विजय जोशी या उपक्रमास शतकाकडे नेण्याचे ध्येय बाळगून आहेत. या ध्येयपूर्तीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा.
– अनिकेत कुलकर्णी (नांदेड)
संपर्क : ८७६७२३६२१४