नाशिक : शहरालगतच्या म्हसरूळ येथील ज्ञानपीठ आधार आश्रमाच्या संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तीन दिवसांपूर्वीच या प्रकरणी एका पीडितेने तक्रार दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर आणखी काही अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.
नाशिक (Nashik) येथील म्हसरुळ परिसरातील ज्ञानपीठ आधार आश्रमाचा संचालक हर्षल मोरे याने हे कृत्य केले. त्याच्यावर म्हसरुळ पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आश्रमातील एका विद्यार्थीनेने हर्षल मोरेविरोधात तीन दिवसांपूर्वी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मोरेला अटक केली. यानंतर पोलिसांनी इतर विद्यार्थीनींचे जबाब नोंदवले. आणखी पाच अल्पवयीन मुलींसोबत असाच प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी १५ मुलींचे जबाब नोंदवले होते. पीडित सहा मुलींपैकी पाच अल्पवयीन आहेत. या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
पोलिसांनी हर्षल मोरेला न्यायालयासमोर सादर केले. न्यायालयाने येत्या बुधवारपर्यंत या संशयित आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि बलात्कारासह ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, कम्युनिस्ट पक्षातर्फे माजी नगरसेवक कॉ. तानाजी जायभावे पक्षाचे शहर कमिटी सदस्य कॉ. संतोष काकडे, मोहन जाधव, नागेश दुर्वे, राहुल गायकवाड यांनी निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन दिले.