सॅनफ्रान्सिको : मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे आली आहे. तेव्हापासून कंपनीत अनेक बदल होत आहेत. ताज्या माहितीनुसार ट्विटरने ४ नोव्हेंबर रोजी भारतातील आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीने मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि इंजिनीअरिंग विभागातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने एकंदरीत ३,७०० जणांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे. त्याचबरोबर इतर अनेक विभागांमध्येही फेरबदल करण्यात येत आहेत. यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना एक मेलही पाठवला आहे.
कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना भल्या पहाटे एक मेल पाठवला. ‘ट्विटरला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी आम्ही ग्लोबल वर्कफोर्स (मनुष्यबळ) कमी करण्याच्या कठीण प्रक्रियेतून जाणार आहोत. आम्ही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसोबतच ट्विटर सिस्टम आणि युझर डेटा साठी सर्व ऑफिसेस तात्पुरत्या स्वरुपात बंद करू. जर तुम्ही ऑफिसमध्ये आहात किंवा जात असाल तर कृपया आपल्या घरी जा,’ असे या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले
दरम्यान, यापूर्वी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि काही अन्य वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मस्क यांनी कामावरून कमी केले होते. त्यानंतर आता मस्क यांनी संपूर्ण कर्मचाऱ्यांनाच कमी करण्यासाठी एक मोहीम सुरू केल्याचे दिसत आहे. भारतातील कर्मचारी कपात हा याचाच एक भाग आहे. भारतात ट्विटरचे ३०० कर्मचारी आहेत आणि सर्व कार्यालयातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांना मस्क यांनी कामावरून कमी केले आहे.