लखनौ : बहुचर्चित नृत्यांगना सपना चौधरी तसेच अन्य चार आरोपींविरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कार्यक्रमाच्या तिकिटासाठी लाखो रुपये उकळल्यानंतरही कार्यक्रम न करता पैसे लुबाडल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.
लखनौ न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत आरोप निश्चित केले. या सुनावणीवेळी सपना चौधरी व अन्य आरोपी न्यायालयात हजर होते. न्यायालयाने या खटल्याची पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी निश्चित केली आहे. सपना चौधरी व्यतिरिक्त इतर सहआरोपी जुनैद अहमद, इवाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्याय यांच्यावरही आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
न्यायालयात आरोपपत्राचे वाचन करण्यात आले तेव्हा या सर्व आरोपीनी आरोप नाकारले आणि खटला पुढे चालू ठेवण्याची मागणी केली. त्यानतंर न्यायालयाने १२ डिसेंबर ही पुढील तारीख निश्चित केली. १३ ऑक्टोबर २०१८ रोजी लखनौच्या स्मृती उपवनमध्ये दुपारी ३ ते १० या वेळेत सपना चौधरी तिच्या सहकलाकारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याकार्यक्रमासाठी प्रति व्यक्ती ३०० रुपयांप्रमाणे ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीटांची विक्री करण्यात आली होती.
हजारो लोकांनी सपना चौधरींचा डान्सचा कार्यक्रम पाहण्यासाठी तिकीट काढले, मात्र सपना चौधरी रात्री १० वाजेपर्यंत आलीच नाही. सपनाची वाट पाहून थकल्यानतंर लोकांनी गोंधळ घातला. लोक तिकीटाचे पैसे परत करण्याची मागणी करत होते पण आयोजकांनी पैसे परत दिले नाहीत, असा आरोप आहे. याप्रकरणी १४ ऑक्टोबर २०१८ रोजी लखनौमधील आशियाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.