सिडने : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी – 20 विश्वचषक स्पर्धेत अंपायर्सच्या अनेक निर्णयांवरून वाद निर्माण झाला आहे. आजही ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान सामन्यादरम्यान सुमार दर्जाच्या अंपायरिंगची जोरदार चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा शेवटच्या षटकात 4 धावांनी पराभव करत आपले सेमी फायनलचे आव्हान जिवंत ठेवले असले तरी आज यजमान संघ सुमार अंपायरिंगचा बळी ठरला.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नवीन उल हक टाकत असलेल्या चौथ्या षटकात अंपायर्सनी एक मोठी चूक केली. नवीनने षटकातील 5 चेंडू टाकले असताना पंचांनी षटक संपल्यांचा निर्णय दिला. जरी हा एका चेंडूचाच विषय असला तरी याचा सामन्यावर खूप मोठा परिणाम झाला असता. जर अफगाणिस्तानने आजचा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला असता तर हा नवीनच्या षटकातील एक कमी टाकलेला चेंडू ऑस्ट्रेलियाची सेमी फायनलची आशा आजच संपवून गेला असता.
टी -20 विश्वचषक स्पर्धा 2022 गट 1 मधील आजच्या सामन्यात अफगाणिस्तानने यजमान ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत झुंजवले. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 20 षटकात 164 धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानच्या राशिद खानने पडझडीनंतर झुंजार खेळी करत 23 चेंडूत नाबाद 48 धावा ठोकल्या.
ऑस्ट्रेलियाने सामना जरी 4 धावांनी जिंकला असला तरी या झुंजार अफगाणिस्तानने इंग्लंडचे काम सोपे केले. आता इंग्लंडला सेमी फायनल गाठण्यासाठी उद्या श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकावा लागणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाने आजचा सामना जिंकून 7 गुण घेऊन जरी दुसऱ्या स्थानावर उडी घेतली असली तरी त्यांचा रन रेट हा -0.173 आहे. तर इंग्लंड सध्या 5 गुण आणि +0.547 रन रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. उद्या इंग्लंडने सामना फक्त एका धावेने जिंकला तरी ते सेमी फायनलसाठी पात्र ठरतील.