होसूर : Apple आपले निर्मिती केंद्र चीनबाहेर स्थलांतरित करण्याच्या तयारीत आहे. चीनमधील झिरो कोविड पॉलिसीअंतर्गत सुरु असलेले लॉकडाउन आणि अनेक निर्बंध तसेच अमेरिकेसोबतचा राजकीय तणाव ही प्रमुख कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगपती रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने मोठी योजना आखली आहे. हा समूह तामिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातील त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पात कर्मचारी संख्या वाढवण्याच्या तयारीत आहे. येत्या दोन वर्षात ४५००० नोकर भरती करण्याची टाटा समूहाची योजना आहे. इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सची निर्मिती करणाऱ्या टाटांच्या या प्रकल्पात iPhone चे सुटे भाग बनवले जातात. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार चीनमध्ये कोरोना निर्बधांमुळे Apple च्या निर्मितीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे आयफोन निर्माता Apple ने भारतात आपले उत्पादन वाढवण्यावर जोर दिला आहे. त्यानुसारच देशांतर्गत अन्य कंपन्याही विस्तार करण्याच्या तयारीत आहेत.
टाटा ग्रुपने Apple कडून अधिकाधिक ऑर्डर मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. टाटा ग्रुप येत्या १८ ते २४ महिन्यात जवळपास ४५००० नोकऱ्या देण्याच्या प्रयत्नात आहे. यात अधिकतर नोकऱ्या महिलांसाठी असतील. टाटा ग्रुप भारतात iPhones असेंबल करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग जॉइंट वेंचर स्थापन करण्यासाठी Wistron सोबत वाटाघाटी करीत आहे. Apple कडून अधिक ऑर्डर मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये रतन टाटा यांच्या समूहाने प्रत्येक टप्प्यावर तयारी वाढवली आहे.
टाटा ग्रुपकडून आतापर्यंत होसूरमध्ये नोकर भरतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आयफोनच्या एकूण व्यवसायातील लहानसा हिस्सा भारतात आहे. तोच वाढवण्याचे प्रयत्न देशांतर्गत कंपन्यांकडून सुरू आहेत. बड्या कंपन्यांसाठी भारत चीनला पर्याय ठरावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्या फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन आयफोनसाठी सुटे भाग तयार करतात.