मुंबई : महाराष्ट्रातून चार माेठे प्रकल्प गुजरातसह अन्य राज्यात स्थलांतरीत झाले असताना आता टाटांचा महत्वाकांक्षी एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत हायजॅक केला गेला आहे. स्थानिकांना राेजगार संधी मिळत नाहीत, परिणामी राज्यात माेठ्या प्रमाणावर बेराेजगारी वाढत आहे. राज्य सरकार सतत गाफिल राहात असल्यामुळे आणि शिंदे सरकारवर उद्याेजकांचा विश्वास राहिलेला नसल्यामुळे उद्याेगांचे स्थलांतर वाढत चालले आहे, अशी आगपाखड विराेधी पक्ष नेत्यांकडून केली जात आहे. त्यावरुन राज्यात चांगलाच गदारोळ माजला आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावरुन सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी हे प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचे कारणही सांगितले आहे.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत याविषयी भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “चौथा मोठा प्रकल्प राज्यातून निघून गेला. मी गेले तीन चार महिने तुमच्यासमोर येऊन या मुद्याला वाचा फोडतोय. या घटनाबाह्य सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांनी सांगितले की आम्ही मिहानमध्ये एअरबस आणूच. आम्हीही हा प्रस्ताव मांडलेला पण आता तो निघून गेला”.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, वेदांता बद्दल जसे त्यांना माहित नव्हते तसे एअरबस बद्दलही माहित नव्हते. या राज्याचे मंत्री खोटे बोलत आहेत का? आम्ही दिल्लीला जाऊन पंतप्रधानांशी बोलू असे का सांगितले? करार झाला हे माहित असूनही त्यांनी ते का सांगितले नाही? खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास नाही, त्यामुळेच उद्योग राज्याबाहेर जात आहेत.
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आपले मुख्यमंत्री मंडळ, दहीहंडी, राजकीय भेटी फोडाफोडी हे सोडून काही करत नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांनी काही उद्योग आणलेले नाहीत. राज्यात हे काय गुंतवणूक आणणार? जसे शिवराजसिंह चौहान, नवीन पटनायक आपल्या राज्यात आले, त्यांनी उद्योजकांशी चर्चा केली, आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं?”
तब्बल 22 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली, तसेच आता 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजिनामा देणार का? असा सवालही विचारला. गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलाच्या सी-295विमानाच्या निर्मितीसाठी हा प्रकल्प उभारला जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सी-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. टाटा एअरबस हा प्रकल्पही नागपूरच्या मिहानमधून गुजरातमध्ये स्थलांतरीत करण्यात आला आहे. या प्रकल्पातून भारतीय हवाई दलाच्या C295 मालवाहतूक विमानांची निर्मिती केली जाणार आहे.
‘मविआ’च जबाबदार : भाजप
एअर बस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर भाजपचे नेते केशव उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना या प्रकल्पासाठी फॉलोअप घेणारे एक तरी पत्र कधी लिहिले का? सप्टेंबर २०२१ मध्ये केंद्र सरकार आणि एअरबस यांच्यात एक करार झाला. त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली नाही. मात्र तत्कालीन मविआ सरकारने एकही पत्र लिहिले नाही. त्यामुळे हा प्रकल्प एक वर्षापूर्वीच गुजरातला गेला होता. तेव्हा मविआने प्रयत्न का केला नाही. हा प्रकल्प गुजरातला जाण्यात मविआचे अपयश असल्याचेही उपाध्ये यांनी म्हटले.
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]