देगलूर (रामचंद्र भंडरवार) : देगलूर तालुक्यात गेल्या कित्येक वर्षापासून हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्याची स्पर्धा शेतकऱ्यात लागली होती. काही वर्षे उत्पन्नही भरपूर निघायचे मात्र सतत तेच पीक घेण्याचा सोस, नेहमी शेतजमीन ओलिताखाली ठेवण्याचे वाढते प्रमाण यामुळे शेतीचा पोत वरचेवर घसरू लागला. याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर झाला. दाणे ऐन भरण्याच्या काळात मर रोगाची लागण झाल्यामुळे उत्पन्न घटू लागले. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांपासून तालुक्यातील शाहापूर, सुगाव, वन्नाळी, आलूर, नंदूर, शेखापूर, लिंबा, कोटेकल्लूर, शेळगाव, शेवाळा, देगाव खुर्द आदीसह परिसरात धने लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.
या परिसरातील सिंचनाखाली बहुतांशी शेती असलेल्या भागात शेतकऱ्यांनी मसाले जन्य असलेल्या कोथिंबीर (धने) या पर्यायी पिकाची कास धरली. बघता, बघता संपूर्ण तालुक्यासह आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक परिसराचा भाग ही रब्बी हंगामातील धने पिकाने व्यापून गेला आहे. त्यात ही हंगामात येणाऱ्या जवस, करडई नगदी पिके म्हणून ओळखली तर जाऊ लागलीच या पिकांना पूर्वी धर्माबाद या शहराखेरीज व्यापार पेठ मिळायची नसे; पण आता तेच व्यापारी थेट बांधावर येऊन धने, करडई, जवस घेऊन जात असल्याने वाहतूक व इतर खर्चात मोठी बचत होत असल्याचे दिसून येत आहे.
५ हजार हेक्टरवर कोथिंबीर, तर करडई ३००० !
रब्बी पिकासाठी प्रसिद्ध असलेले देगलूर तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षात पीक बदल करीत आहेत. हरभरा पिकावर मर रोग पडत असल्याने या पिकाची जागा आता धने, करडई या पिकाने घेतली आहे. यंदा तालुक्यात २७८१ हेक्टरवर झालेल्या करडईचे लाकडी घाण्यावर तेल काढण्याचा व त्याच्या विक्रीचा व्यवसाय वाढला आहे. राजमा पिकाची लागवड ही ८१ हेक्टरवर झाली आहे.