पॅरिस : Khabarbat News Network
फ्रान्समध्ये आज (गुरूवार) गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात मोठा देशव्यापी सामुदायिक संप पुकारण्यात आला. कामगार संघटनांनी एकजूट दाखवत रस्त्यांवर उतरण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान सेबेस्टियन लेकोर्नू यांनी जाहीर केलेल्या कठोर अर्थसंकल्पीय कपातीचा निषेध करण्यासाठी २४ तासांचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. कामगार, पेन्शनधारक आणि सामान्य नागरिकांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी सरकारवर दबाव आणणे, हा या संपाचा मुख्य उद्देश होता.


पोलिसांच्या अंदाजानुसार, देशभरात सुमारे ८ लाख लोक या निदर्शनांमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे शाळा, रेल्वे आणि हवाई सेवा बाधित झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने ८०,००० पोलीस कर्मचारी तैनात केले. जाळपोळीच्या घटना घडल्या असून निदर्शकांवर पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याच्या फवा-याचा मारा केला. दरम्यान, २०० जणांना अटक करण्यात आली.
फ्रान्सवर आर्थिक दबाव : सध्या फ्रान्सवर मोठा आर्थिक दबाव आहे. देशाची अर्थसंकल्पीय तूट युरोपीय संघाच्या मर्यादेच्या दुप्पट आहे आणि कर्ज जीडीपीच्या ११४%पर्यंत पोहोचले आहे.
अर्थसंकल्पीय वादामुळे तणाव
माजी पंतप्रधान बेयरू यांनी ४४ अब्ज युरोची कठोर अर्थसंकल्पीय कपात करून देशाचे कर्ज कमी करण्याची योजना आखली होती. त्यात दोन सार्वजनिक सुट्या रद्द करण्याचा प्रस्ताव होता, जो नवीन पंतप्रधान लेकोर्नू यांनी रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही, कल्याणकारी योजनांवरील खर्च कमी केला जाईल, अशी भीती कामगार संघटनांना वाटते आहे. जर या बजेटवर सहमती झाली नाही, तर विरोधक अविश्वास प्रस्ताव आणून लेकोर्नू यांनाही हटवू शकतात.