नवी दिल्ली : प्रतिनिधी
यमुनेच्या पुरामुळे राजधानी दिल्लीत हाहाकार उडाला आहे. असंख्य घरे पाण्याखाली गेली असून, संततधार पावसामुळे यमुनेच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, २०७.४१ वर पाणी पातळी पोहोचली आहे. ६३ वर्षांत यमुनेने चौथ्यांदा ही पाणीपातळी गाठली आहे. त्यामुळे हजारो लोकांना सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा लागला आहे. यमुनेला आलेल्या पुरामुळे दिल्लीच्या नाकातोंडातच पाणी गेले आहे. गुरूवारी सकाळी नदीचे पाणी दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचले होते.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिल्लीतील काही भागांची अवस्था बिकट झाली आहे. मुसळधार पाऊस यमुनेला आलेला महापूर यामुळे दिल्लीतील नदीकाठचीच नाही, तर इतर ठिकाणचीही घरे पाण्यात बुडाली आहेत. गुरुवारी सकाळी ७ वाजेपर्यंत दिल्लीतील जुन्या रेल्वे पुलावर यमुना नदीची पाणी पातळी २०७.४८ मीटर इतकी नोंदवली गेली आहे. रात्री २ वाजेपासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत पाणी पातळी स्थिर होती, असे अधिका-यांनी सांगितले.
पुरात घरे बुडालेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जात आहे. काही ठिकाणी निवारा शिबिरातच पाणी शिरल्याने, मोठा गोंधळ उडाला होता. राजघाटाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. रिंग रोड परिसरातील कार्यालयांबाहेरही पाणी भरले आहे. त्यातच नाल्यांतील पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर वाहू लागले आहे. दिल्लीच्या मंत्रालयाजवळ असलेल्या भुयारी मार्गात वेगाने पाणी भरले. भुयारी मार्गातील पाणी मंत्रालयाच्या दिशेने निघाले. पावसाचा जोर कायम राहिल्यास त्यात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.