नवी दिल्ली : प्रतिनिधी
देशातील बँकिंग आणि वित्तीय सेवा (बीएफएसआय) क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, २०३० पर्यंत या क्षेत्रात तब्बल २.५० लाख नवीन नोक-या निर्माण होण्याची शक्यता आहे, असे ‘अडेको इंडिया’च्या ताज्या अहवालात म्हटले आहे. या क्षेत्रात पुढील वर्षी (२०२५-२६) साधारण ८.७ टक्के आणि २०३० पर्यंत सुमारे १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ अपेक्षित आहे.

विशेष म्हणजे, या नोक-या केवळ मोठ्या महानगरांपुरत्या मर्यादित नसून, पुणे, जयपूर, अहमदाबाद, सुरत, इंदूर आणि लखनौसारख्या दुस-या, तिस-या श्रेणीतील शहरांमध्ये संधी निर्माण होत असून इथे ४८% नव्या नोक-या उपलब्ध होतील.
नोक-यांत वाढ होण्याचे कारण…
ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मागणी प्रचंड वाढली आहे. या नोक-यांमध्ये चांगले वेतन मिळणार असून, उमेदवारांना १०-१५% अधिक पगार मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक भाषेचे ज्ञान आणि प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव असलेल्यांना नोकरीची शक्यता २.५ पट जास्त आहे.
कोणत्या नोक-या मिळणार?
सेल्स आणि रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह, डिजिटल प्रॉडक्ट मॅनेजर्स, क्रेडिट रिस्क अॅनालिस्ट्स, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि चॅटबॉट डेव्हलपर्स, सेबी सर्टिफाइड गुंतवणूक सल्लागार, एम्बेडेड फायनान्स प्रॉडक्ट मॅनेजर्स, डेटा सायंटिस्ट, आणि एआय/एमएल इंजिनिअर्स, एआय-आधारित क्लेम स्पेशालिस्ट्स, फ्रॉड डिटेक्शन अॅनालिस्ट्स, मायक्रो विमा एजंट, अॅक्च्युुरियल आणि ग्राहक सेवा टीम्स, सायबर सुरक्षातज्ज्ञ, ईएसजी स्ट्रॅटेजी प्रमुख, एआयएफ/पीएमएस, कम्प्लायन्स अधिकारी, डिजिटल वेल्थ मॅनेजर्स.
उपयुक्त ऑनलाइन कोर्सेस
ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म्स बँकिंग क्षेत्रासाठी विशेष कोर्सेस देत आहेत. यामध्ये आर्थिक विश्लेषण, डेटा सायन्स, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि फिनटेक यांचा समावेश आहे. यामुळे उमेदवार घरातूनच या क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये शिकू शकतात आणि नोकरीच्या संधीसाठी अधिक पात्र होऊ शकतात.