जालना : प्रतिनिधी
NCP Leader Rajesh Tope (Jalna) | सध्या सोशल मीडियावर माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते राजेश टोपे हे भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला आहे. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत टोपे यांनी आज यासंबंधी स्पष्ट भूमिका मांडली. टोपे म्हणाले, मी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत जे काही मेसेज किंवा अफवा सोशल मीडियावर फिरत आहेत, त्या सर्व निराधार, खोट्या आणि निव्वळ अफवा आहेत. मी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटलेलो देखील नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) सोडणार नाही. गेली अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून मी काम करत आहे आणि यापुढेही तेच काम मनापासून करत राहणार आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राजेश टोपे हे मराठवाड्यातील प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षाचे मराठवाड्यातील महत्वाचे नेते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या भाजपात जाण्याच्या शक्यतेवरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, त्यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.