अलिगढ : News Network
Marathi courses at Aligarh University | उत्तर प्रदेशातील अलिगढ विद्यापीठात शेकडो विद्यार्थी मराठी भाषा शिकत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील रोजगाराच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी मराठी विषयाचा अभ्यासक्रम निवडला आहे.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषा वादात उत्तर भारतीयांवर होणा-या हल्ल्यांमुळे एक नवीन वाद सुरू झाला आहे. मराठी भाषा न येणा-यांना मारहाण केली जात आहे. अशा वातावरणात उत्तर भारतातील विद्यार्थीही सावध झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणारे उत्तर भारतीय राज्यांतील विद्यार्थी अलिगढ मुस्लीम विद्यापीठात मराठी भाषा शिकत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की भाषा हे संवादाचे माध्यम आहे आणि तिथे गेल्यावर त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ते ही भाषा शिकत आहेत.
अलिगड मुस्लिम विद्यापीठात मराठी शिकणा-यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. येथे सुमारे ४०० ते ४५० विद्यार्थी मराठी भाषा शिकत आहेत. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश येथील ४५० विद्यार्थी मराठी भाषेचा अभ्यास करत आहेत. यामध्ये पदवीपूर्व, पदव्युत्तर, पदविका, पीएचडीचे विद्यार्थी आहेत. मराठी शिकणा-यांपैकी सुमारे ६० टक्के विद्यार्थी उत्तर प्रदेशातील आझमगढ, बस्ती, गोरखपूर, गाजीपूर, बनारस, संभल येथील आहेत.