नवी दिल्ली : News Network
जपानच्या शास्त्रज्ञांनी तब्बल १.०२ पेटाबिट्स प्रतिसेकंद इतका प्रचंड इंटरनेट स्पीड प्राप्त करून नवा विक्रम केला आहे. हा स्पीड अमेरिकेत सध्या वापरल्या जाणा-या इंटरनेट जोडण्यांच्या तुलनेत ३.५ दशलक्ष पट, तर भारतातील स्पीडच्या तुलनेत १६ दशलक्ष पट अधिक आहे.

जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी एका चाचणीत हा स्पीड प्राप्त केला. त्यांनी केलेल्या प्रयोगात १९ कोअर ऑप्टिकल फायबर वापरण्यात आली. त्याद्वारे क्षणातच १,८०८ किलोमीटर दूरपर्यंत डाटा पाठविण्यात आला. हे अंतर लंडन ते रोम इतके आहे. हा स्पीड इतका प्रचंड आहे की, नेटफ्लिक्सची संपूर्ण लायब्ररी एका सेकंदात डाउनलोड होऊ शकेल. तसेच वॉरझोनसारखे १५० जीबी व्हिडीओ गेम डोळ्यांची पापणी लवायच्या आत डाऊनलोड होतील.
अमेरिकेतील ब्रॉडबँडची सरासरी स्पीड २९० एमबीपीएस, तर भारतातील ब्रॉडबँडची स्पीड ६३.५५ एमबीपीएस आहे. जपानच्या शास्त्रज्ञांनी प्राप्त केलेला स्पीड तब्बल १,०२०,०००,००० एमबीपीएस इतका प्रचंड आहे.
इंटरनेट स्पीडची ही जादूई कामगिरी १९-कोअर ऑप्टिकल फायबर केबलच्या डिझाइनमुळे शक्य झाली आहे. यात एकेरी लाइट पाथ वापरण्याऐवजी फायबरच्या तेवढ्याच जाडीत १९ स्वतंत्र कोअर वापरण्यात आले आहेत.