संभाजीनगर : प्रतिनिधी
CA Topper | द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे महिन्यात घेतलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, छत्रपती संभाजीनगर येथील राजन काबरा याने देशात प्रथम, तर मुंबईतील मानव शाह याने देशात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. राजन याने ६०० पैकी ५१६ गुण मिळवले; तर कोलकाता येथील निष्ठा बोथ्रा ही देशात दुसरी आली. तिला ५०३ गुण मिळाले. मानव शाहला ४९३ गुण मिळाले.

राजन काबरा हा इंटरमीजिएट व फाउंडेशन परीक्षेतही देशात अव्वल ठरला होता. फाउंडेशन, इंटरमीजिएट व सीए अंतिम परीक्षेत एकाच विद्यार्थ्याने देशात टॉपर येणे हा विक्रम राजन काबराच्या नावावर नोंदविला गेला आहे.
सीए इंटरमीजिएट परीक्षेत मुंबईतील दिशा गोखरू देशात पहिली, तर छत्रपती संभाजीनगरचा यश देविदान दुसरा आला. दिशाला ५१३, तर यशला ५०३ गुण मिळाले. जयपूरची यमिश जैन आणि उदयपूरचा निलय डांगी यांनी एकत्रित तिसरा क्रमांक पटकाविला. त्या दोघांना ५०२ गुण मिळाले.
सीए फाउंडेशन परीक्षेत मुंबईचा यज्ञेश दुसरा ठरला. सीए फाउंडेशन परीक्षेत वृंदा अग्रवाल ३६२ गुण मिळवून देशात अव्वल ठरली; तर मुंबईचा यज्ञेश नारकर ३५९ गुण मिळवून दुसरा आला. ठाण्याच्या शार्दूल विचारे याने ३५८ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला.